• Tue. Feb 24th, 2026

राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या अहिल्यानगर शाखेचा शुभारंभ

ByMirror

Feb 24, 2026

लोककलावंत, दिव्यांगा आणि निराधारांच्या हक्कांसाठी संघटनेचा पुढाकार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) अहिल्यानगर शाखेचे उद्घाटन करण्यात आले. पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी साहित्य, कला आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधला गेला.


या कार्यक्रमास सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर, कोतवाली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. भूषण बऱ्हाटे, संस्थापक अध्यक्ष संदीपकुमार बोरकर, विभागीय अध्यक्ष सुभाष सोनवणे, जिल्हाध्यक्ष पै. नाना डोंगरे, महिला जिल्हाध्यक्षा सरोज आल्हाट, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, सारिका अंधारे, संदीप रासकर, मनिषा चव्हाण, बाळासाहेब मुन्तोडे, शकुंतला काळे, अर्चना काळे, कवी आनंदा साळवे आदी उपस्थित होते.


राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती ही संघटना लोककलावंत, दिव्यांग आणि निराधार घटकांचे प्रतिनिधित्व करत त्यांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी कार्यरत आहे. शासकीय योजनांचा लाभ लाभार्थी पर्यंत पोहोचवणे, सामाजिक सन्मान मिळवून देणे आणि कलावंतांच्या समस्या शासन दरबारी मांडणे यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष संदीपकुमार बोरकर म्हणाले की, “लोककलावंत हे आपल्या संस्कृतीचे जिवंत दूत आहेत. मात्र अनेक कलाकार व दिव्यांग बांधव आजही उपेक्षित अवस्थेत जीवन जगत आहेत. त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे. अहिल्यानगर शाखेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


पोलीस उपनिरीक्षक तथा राष्ट्रपती पोलीस पदक विजेते रतीलाल चौधर म्हणाले की, समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रशासनाचे नेहमीच सहकार्य राहील. लोककलावंत आणि दिव्यांगांचे प्रश्‍न केवळ सहानुभूतीने नव्हे तर ठोस कृतीने सोडवले गेले पाहिजेत. अशा संघटनांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जिल्हाध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी संघटनेच्या भविष्यातील कार्याचा आढावा घेत सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शाखा स्थापन करून लोककलावंत, दिव्यांग व निराधार बांधवांना संघटित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांना कायदेशीर मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी लोककलावंत व दिव्यांग बांधव देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *