ठाणे संघाने पटकावले उपविजेतेपद; 2 हजार खेळाडूंचा सहभाग
अहिल्यानगर जिल्ह्याचे राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत मुंबई उपनगरने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर ठाणे संघाने उपविजेतेपद पटकावले. कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेल्या लहानग्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवत स्पर्धेत रंगत आणली.
या स्पर्धेचा समारोप प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचिल, अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रा. सुनिल जाधव, कार्याध्यक्ष रंगनाथ डागवाले, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अरूण यशवंत चंद्रे, आयोजन समितीचे सचिव व जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश भालेराव, राज्य स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी राकेश सावे, चंद्रकांत पाटील, जिल्हा संघटनेचे श्रीरामसेतु आवारी, संदीप घावटे, अजित पवार, धनंजय देवकर, जगन गवांदे, नितीन निकम व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षक व पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने खेळाडू, प्रशिक्षक व पालक उपस्थित होते.
या स्पर्धेत 8 , 10, 12 व 14 वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी धावणे, गोळा फेक, लांब उडी, रिले या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. यात खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण मैदान खेळाडू, प्रशिक्षक व प्रेक्षकांनी गजबजून गेले होते. यावेळी दिनेश भालेराव यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा फोटो फिनिश कॅमेरा हा दिल्लीवरून मागून घेण्यात आला होता. राष्ट्रीतस्तरावरील खेळाडू घडण्यासाठी नवोदित खेळाडूंचा चालना दिली जात आहे. लहान वयोगटातच मुला-मुलींना योग्य संधी व व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्यातील क्रीडा गुणांना दिशा मिळते. जिल्हा व राज्य पातळीवरील अशा स्पर्धांमधूनच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहकडे यांनी केले. यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजन समितीचे कौतुक केले. या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाल्याची भावना उपस्थित पालक व क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली .
सबज्युनिअर मैदानी स्पर्धा ही भारतातील एकमेव महाराष्ट्र राज्यात आयोजित केली जात असून, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील जाधव व सचिव दिनेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्याने अतिशय उत्तम प्रकारचे आयोजन करून अप्रतिम अशा स्पर्धा संपन्न केल्या. -सतीश उचिल (सचिव , महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोशिएशन)
