जय हिंद फाउंडेशनची मागणी
विद्यार्थी, नोकरदार व रुग्णांची गैरसोय; आठवड्यात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या पंचवीस वर्षांपासून लोहसर परिसरातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेली शेवगाव-अहिल्यानगर लोहसर एसटी बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी -मागणी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांनी अहिल्यानगरचे विभागीय वाहतूक अधीक्षक चं. शा. चौधरी यांना निवेदन दिले.
लोहसर येथून सकाळी लवकर नगरकडे जाणारी ही पहिली बस विद्यार्थ्यांसाठी, नोकरदारांसाठी, कामगारांसाठी तसेच आजारी व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची होती. मात्र काही काळापासून ही बस सेवा बंद असल्याने संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांवर मोठा परिणाम झाला आहे.
लोहसर, खांडगाव, धारवाडी, चिचोंडी, डोंगरवाडी, गीतेवाडी, डमाळवाडी, कडगाव, शिराळ, कोल्हार, उदरमल, बहिरवाडी, जेऊर या गावांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होत असून परीक्षांचा कालावधी जवळ आल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नोकरदार वर्गालाही नगर येथे नोकरीसाठी पोहोचताना अडथळे येत आहेत.
तसेच गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी ही बस ‘जीवनदायी’ म्हणून ओळखली जात होती. सकाळी लवकर नगर येथे उपचारासाठी जाण्याचा हा एकमेव सोयीचा पर्याय होता. सेवा बंद झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून आर्थिक भारही वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर जय हिंद फाउंडेशनने जिल्हा परिवहन नियंत्रक अधिकाऱ्यांकडेही निवेदन देत ही बस सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. निवेदनात, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी परिवहन प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आठवड्याभरात बस सेवा सुरू न झाल्यास पुन्हा निवेदन देऊन चिचोंडी येथे नाईलाजाने आंदोलन छेडावे लागेल, अशी भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
