• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन; राष्ट्रवादीची आग्रही भूमिका

ByMirror

Feb 10, 2026
भिंगार टेकडीवरील सनई पुन्हा सुरू करावी

भिंगार टेकडीवरील सनई पुन्हा सुरू करावी

भिंगार टेकडीवरील समाजकंटकांवर कारवाईची मागणी; जॉगिंग पार्क प्रश्‍नही ऐरणीवर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेली भिंगार टेकडी येथील पारंपरिक सनई पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भिंगार शहर व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन भिंगार कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी संपत बेरड व दिनेश लंगोटे उपस्थित होते.


पूर्वी भिंगार टेकडीवर दररोज पहाटे साडेपाच आणि रात्री साडेनऊ वाजता नियमितपणे सनई वाजवली जात होती. या सनईच्या माध्यमातून सकाळी पाणी सुटणार आहे की नाही, याची माहिती नागरिकांना दिली जात असे. तसेच रात्रीच्या सनईवेळी कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून नागरिकांना पाणीपट्टी, घरपट्टी किंवा इतर महत्त्वाच्या सूचना व आवाहने केली जात होती.
सध्या भिंगार परिसरात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास असून, अनेकांकडे मोबाईल फोन नसणे किंवा सतत मोबाईल वापरणे शक्य नसल्यामुळे पाणी सुटले की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे पारंपरिक सनई पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


याशिवाय, भिंगार टेकडी परिसरात अंधार पडल्यानंतर काही समाजकंटकांकडून गैरप्रकार केले जात असून परिसर दूषित होत असल्याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रकारांवर तात्काळ कारवाई करून टेकडी परिसर सुरक्षित ठेवावा, अशीही मागणी करण्यात आली.


तसेच भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क संदर्भातील विविध समस्या व तेथील सुविधांबाबतही कॅन्टोन्मेंट प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या जॉगिंग पार्कच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *