शिवसेना सामाजिक न्यायविभाग विभागाचे विनोद साळवे यांचे जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना निवेदन
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसीतील एल ॲण्ड टी कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना (एकनाथ शिंदे) सामाजिक न्याय विभाग विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी तात्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दक्षिण विनोद साळवे यांनी केली आहे.
एल ॲण्ड टी कंपनीच्या गेट क्रमांक 3 समोर असलेल्या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यालगत शेकडो झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आहे. वन विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कंपनीने स्वतःच्या सोयीसाठी, विशेषतः बेकायदेशीर पार्किंगच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कत्तल केवळ झाडांच्या फांद्यांपुरती मर्यादित नसून, थेट झाडांच्या खोडापर्यंत तोड करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे.
पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली झाडे अशा पद्धतीने तोडली जाणे हे पूर्णपणे बेकायदेशीर व पर्यावरणपूरक नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे शिवसेनेच्या ओबीसी विभागाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, एमआयडीसी कार्यालयाच्या अगदी जवळच ही घटना घडूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संबंधित विभागांची भूमिका संशयास्पद ठरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वृक्षरोड प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (एकनाथ शिंदे) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
