• Thu. Feb 5th, 2026

शहरात प्रवेश करतानाच कचऱ्याचे स्वागत; अहिल्यानगरची प्रतिमा मलीन

ByMirror

Feb 5, 2026

कचऱ्याचे ढिग तात्काळ हटवा पर्यावरणवादी गोरक्षनाथ गवते यांची मागणी


कारवाई न झाल्यास 14 फेब्रुवारीला मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात प्रवेश करताना चोहीबाजूंनी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहराची प्रतिमा पूर्णतः मलीन होत असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते तथा जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी केला आहे. शहराच्या दर्शनी भागात असलेले हे कचऱ्याचे ढीग तात्काळ उचलण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


शहरातील बुऱ्हाणनगर व भिंगार परिसरातून अहिल्यानगरकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीकडून शहरात येताना तसेच महामार्गाच्या कडेला देखील कचऱ्याचे ढीग दिसून येतात. परिणामी, शहरात प्रवेश करतानाच नागरिक व पाहुण्यांना घाणीचे दर्शन घडत असून, यामुळे अहिल्यानगरची स्वच्छ शहर म्हणून असलेली ओळख धोक्यात आली आहे.


एकीकडे शहराला स्वच्छतेसाठी विविध पुरस्कार मिळत असताना, दुसरीकडे प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढिग दिसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे गवते यांनी सांगितले. हा कचरा तात्काळ उचलण्यात न आल्यास 14 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारात प्रतिकात्मक स्वरूपात कचरा टाकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेच्या बैठकीत बोलताना गोरक्षनाथ गवते यांनी वाढत्या प्रदूषणावर तीव्र चिंता व्यक्त केली. “मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये प्रदूषणाने भयंकर स्वरूप धारण केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात सुमारे 42 टक्के वनक्षेत्र होते, आज ते केवळ 0.4 टयांवर आले आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे,” असे त्यांनी सांगितले.
झाडतोड थांबवली नाही, तर भविष्यात मानवासह सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. शासनाने या गंभीर प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.


“पर्यावरण रक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील झाडांचे संरक्षण करणे अत्यावश्‍यक आहे. झाडे वाचली तरच स्वच्छ हवा, शुद्ध ऑक्सिजन आणि निरोगी जीवन शक्य आहे. दररोज हजारो-लाखो झाडांची कत्तल होत आहे, ही कत्तल कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि ती कधी थांबणार?” असा प्रश्‍न गवते यांनी उपस्थित केला.


या बैठकीस पोपटराव पटारे, निलेश साठे, विकास भीटे, प्रकाश भिटे, सचिन गवते, किरण गवते, महेश मंडलिक, सिताराम मंडलिक, गोविंद गडाख, दत्ता देवकर, मनोज देशमाने, नवनाथ गवते, अरुण गवते, गणेश भिटे, भाऊसाहेब मोरे, शिवाजी पालवे, अंबादास कांडेकर, पोपटराव महारनवर आदी मान्यवर उपस्थित होते.


कचऱ्यामुळे प्राणीजीवन धोक्यात
शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे पर्यावरणातील अनेक सजीवांवर गंभीर परिणाम होत आहे. रस्त्यालगत असलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक खाल्ल्याने गायी, कुत्रे यांसारख्या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक साचत असून त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले आहे. अहिल्यानगरच्या दर्शनी भागात असलेला हा कचरा जणू येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे “स्वागत”च करत असल्याची उपरोधिक टीका गवते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *