• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

अपघातग्रस्त रोहन जाधव यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली मदत

ByMirror

Nov 24, 2025
उपचारानंतर रोहन जाधव सुखरूप घरी

विनोद साळवे यांच्या पाठपुराव्याला यश


उपचारानंतर रोहन जाधव सुखरूप घरी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जामखेड रोड, निंबोडी येथे 11 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोहन राजू जाधव या युवकावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताच्या घटनेनंतर जाधव यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने वैद्यकीय खर्च भागविणे कुटुंबासाठी कठीण झाले होते.


या परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना दक्षिण अनुसूचित जाती विभागाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांनी तातडीने पुढाकार घेत जाधव यांच्या कुटुंबाची वैद्यकीय, कायदेशीर व प्रशासकीय मदत करण्यास सुरुवात केली. अपघाताची तक्रार भिंगार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेण्यापासून ते सर्व आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत साळवे यांनी स्वतः देखरेख केली.


त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांचे शिफारस पत्र घेऊन साळवे यांनी जाधव यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा मुख्यमंत्री सहायता कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर तसेच मुख्यमंत्री सहायता कक्ष, मंत्रालय मुंबई येथे सातत्याने केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून मुख्यमंत्री सहायता निधीतून रोहन जाधव यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. दरम्यान, जाधव यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून उपचारानंतर ते आता सुखरूप घरी परतले आहेत. अपघाताच्या कठीण प्रसंगी मिळालेल्या या मदतीमुळे जाधव कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी विनोद साळवे यांनी केलेल्या निस्वार्थ, सातत्यपूर्ण आणि तत्पर पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.


वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वेळेवर मदत मिळत असते, त्यासाठी योग्य पाठपुरावा व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. एखाद्या गरजूला याबाबत माहिती व मदत लागल्यास संपर्क करण्याचे साळवे यांनी म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *