• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

गणेशोत्सवापूर्वी शिक्षक-शिक्षकेतरांना वेतन द्या

ByMirror

Aug 19, 2025

शिक्षक परिषदेचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन

राज्योत्सवाच्या आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी ऑगस्टचे वेतन आगाऊ द्यावे -बाबासाहेब बोडखे

नगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्योत्सवाचा दर्जा दिला असताना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हा उत्सव उत्साहात व आनंदाने साजरा करू शकतील यासाठी माहे ऑगस्ट 2025 चे नियमित वेतन 25 ऑगस्टपूर्वी वितरित करण्याचा आदेश निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.


या संदर्भात शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांना निवेदन पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


महाराष्ट्राचे दैवत आणि विद्येची देवता असलेले गणपती बाप्पा यांच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरू असून यंदा बुधवार, 27 ऑगस्टपासून गणेशोत्सव प्रारंभ होणार आहे. हा उत्सव महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात उत्साहात व श्रद्धापूर्वक साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपापल्या कुटुंबासमवेत हा उत्सव समाधानाने साजरा करू शकतील, यासाठी वेतन वेळेत मिळणे अत्यावश्‍यक आहे, असे परिषदेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.


शासनाने गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल शिक्षक परिषदेच्या वतीने सरकारचे अभिनंद करण्यात आले आहे.तथापि, शिक्षक-शिक्षकेतरांच्या घरगुती तयारीसाठी आर्थिक तरतूद होणे गरजेचे असल्याने माहे ऑगस्ट 2025 चे वेतन 25 ऑगस्टपूर्वी वितरित करण्याचे आदेश तात्काळ निर्गमीत करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्योत्सवाच्या आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी ऑगस्टचे वेतन आगाऊ मिळणे गरजेचे असल्याची भावना बाबासाहेब बोडखे यांनी व्यक्त केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *