शिक्षकांवर दबाव टाकू नये
मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीची मागणी
नगर (प्रतिनिधी)- नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार कायम सताना शिक्षण विभागाने शिक्षकांवर दबाव टाकू नये, या मागणीचे निवेदन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकारी संध्या भोर व कार्यालयीन अधीक्षक महावीर धोदाड यांना देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, बाबासाहेब मुळे, वैभव सांगळे, तौसीफ शेख, सचिन गुंजाळ, कैलास घोडके, कमलेश पवार, अरुण चौधरी आदींसह शिक्षक उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीने 22 ऑगस्ट रोजी पत्र देऊन शालाबाह्य कामे असलेल्या नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. तरी देखील काही तालुक्यांमध्ये अजूनही काही गट शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक व शिक्षकांना नवभारत साक्षरता सर्वेक्षण करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सध्या सर्व शाळांमध्ये पदभरती नसल्यामुळे निम्मे शिक्षक कार्यरत आहेत. तसेच काही शिक्षकांना बीएलओचे कामे दिलेली आहेत. त्याचप्रमाणे सध्या आधार अपडेट, आधार कार्ड काढणे, वाचन प्रकल्प, घटक चाचणी परीक्षा, विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे इत्यादी कामे चालू आहेत. त्यामुळे नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार राहणार आहे. सदर योजनेतील कामे सर्व शालाबाह्य असून, हे कामे करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांवर दबाव टाकू नये, अशी मागणी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
