• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

मारहाणीची तक्रार केल्याने पोलीसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या

ByMirror

Dec 19, 2024
मारहाणीची तक्रार केल्याने पोलीसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या

सदर पोलीस अधिकारी व कर्मचारीवर कारवाईची मागणी

रिपाईच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; 26 डिसेंबर पासून उपोषणाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे युवक तालुकाध्यक्ष जयराम आंग्रे यांना विनाकारण मारहाण करणारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या सोबत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर अद्यापि कारवाई करण्यात आलेली नसल्याने 26 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे. तर सदर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केल्याने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या सदर युवकास दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रिपाईचे युवक तालुकाध्यक्ष जयराम आंग्रे 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मतदान करण्यासाठी देहरे गावातील मतदान केंद्रावर गेले होते. त्या ठिकाणी मतदान करून बाहेर येत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या समवेत असलेल्या तीन सहकारी पोलीसांनी त्यांना विनाकारण बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांना 21 नोव्हेंबरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आंग्रे यांनी 27 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केलेली आहे. तक्रार केल्याचा राग येऊन सदर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या त्यांना दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या युवकास मारहाण करणारे व तक्रार केल्याचा राग धरुन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या देणाऱ्या एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व त्या तीन कर्मचारींवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, शहर उपाध्यक्ष प्रतिक नरवडे, सोनू ठोंबे, योगेश त्रिभूवन, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, मायाताई जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *