• Sun. Aug 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉलमध्ये पोदार स्कूलचा दणदणीत विजय; ज्ञानसंपदाने तक्षिलाला रोखले

ByMirror

Aug 9, 2026
मुलींच्या उपांत्य फेरीचे सामने सोमवारपासून; फुटबॉलच्या मैदानावर रंगला चुरशीचा थरार

मुलींच्या उपांत्य फेरीचे सामने सोमवारपासून; फुटबॉलच्या मैदानावर रंगला चुरशीचा थरार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी (दि. 9 ऑगस्ट) चुरशीच्या फुटबॉल खेळाचा थरार अनुभवायला मिळाला. फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत विविध वयोगटांतील दोन सामने रंगले. एका सामन्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींनी तब्बल चार गोल करत कर्नल परब स्कूलवर एकतर्फी विजय मिळवला, तर मुलांच्या सामन्यात ज्ञानसंपदा स्कूलने तक्षिला स्कूलचा प्रतिकार मोडून काढत 1-0 असा विजय नोंदविला.
16 वर्षांखालील मुलींच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध कर्नल परब स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात पोदार स्कूलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत मैदानावर वर्चस्व निर्माण केले. खेळाच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रावर दबाव निर्माण करणाऱ्या पोदारच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट पासिंग आणि आक्रमक चालींच्या जोरावर गोलची संधी निर्माण केली. पोदार स्कूलकडून आरुषी गायकवाड हिने 8 व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. या गोलमुळे पोदारच्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास आणखी वाढला. त्यानंतर काव्या झावरे हिने 21 व्या आणि 38 व्या मिनिटाला सलग दोन गोल करत पोदार स्कूलची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. सामन्याच्या उत्तरार्धातही पोदारच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ कायम ठेवला. आरुषी गायकवाड हिने 43 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदविला. अखेरपर्यंत पोदार स्कूलने कर्नल परब स्कूलला गोल करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे पोदार इंटरनॅशनल स्कूलने कर्नल परब स्कूलचा 4-0 गोलने पराभव करत दणदणीत विजय मिळविला.


16 वर्षांखालील मुलांच्या गटात तक्षिला स्कूल विरुद्ध ज्ञानसंपदा स्कूल यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच बचाव आणि आक्रमण यांचा योग्य समन्वय साधत खेळ केला. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. दुसऱ्या हाफमध्ये सामन्याची रंगत आणखी वाढली. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. अखेर ज्ञानसंपदा स्कूलच्या शुभम सानप याने 44 व्या मिनिटाला निर्णायक गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. गोल झाल्यानंतर तक्षिला स्कूलने आक्रमक पवित्रा घेत सामना बरोबरीत आणण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र ज्ञानसंपदा स्कूलच्या बचावफळीने भक्कम खेळ करत तक्षिलाच्या खेळाडूंना गोल करण्यापासून रोखले. अखेर शुभम सानपचा एकमेव गोल निर्णायक ठरला आणि ज्ञानसंपदा स्कूलने तक्षिला स्कूलवर 1-0 असा विजय मिळविला.


–—
सोमवारपासून मुलींच्या उपांत्य फेरीचा थरार
मुलींच्या गटातील लीग पद्धतीच्या सामन्यांची सांगता झाली असून गुणतालिकेतील कामगिरीच्या आधारे चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्‍चित केला आहे. त्यामुळे आता स्पर्धेतील रंगत आणखी वाढणार असून सोमवारपासून मुलींच्या गटातील उपांत्य फेरीचे सामने नॉक आऊट पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीत आर्मी पब्लिक स्कूल विरुद्ध पोदार इंटरनॅशनल स्कूल असा सामना रंगणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध प्रवरा पब्लिक स्कूल आमनेसामने येणार आहेत.


या दोन्ही सामन्यांतील विजयी संघांना अंतिम फेरीचे तिकीट मिळणार असून, त्यामुळे अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी खेळाडूंच्या कौशल्याची आणि संघनियोजनाची खरी कसोटी लागणार आहे. उपांत्य फेरीतील सामन्यांमध्ये कोणता संघ बाजी मारतो आणि अंतिम फेरीत स्थान मिळवतो, याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *