• Tue. Mar 10th, 2026

परभणीतील संविधान शिल्पाच्या अवमानाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

ByMirror

Dec 14, 2024

दोषी व माथे भडकविणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी येथे संविधानाच्या शिल्पाची झालेल्या तोडफोड प्रकरणाचा निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींना व माथे भडकविण्याचे काम करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निवेदन देण्यात आले. तर संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनिफ शेख, संघटक शफी शेख, सल्लागार जे.डी. शिरसाठ, महासचिव अमर निरभवणे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, शरद वाघुंबरे, देवीदास भालेराव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


सध्या देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू आहे. सरकारकडून अशा अनेक घटना आळा घालण्यासाठी आवश्‍यक प्रयत्न होताना दिसून येत नाहीत, उलटपक्षी अशा प्रकरणातील दोषींना पाठबळ देण्याचे काम सरकार करताना दिसत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.
परभणी येथे संविधानाच्या शिल्पाची झालेल्या तोडफोड प्रकरणानंतर दलित वस्ती मध्ये कोंबिंग ऑपरेशन करून विनाकारण दलित बांधवांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. यामुळे संविधान विरोधी शक्तींची हिम्मत वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून 10 डिसेंबर रोजी परभणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिमेचे अवमान करणारी संतप्त घटना घडली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर संविधानाच्या शिल्पाची झालेल्या तोडफोड प्रकरणाचा निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींना व माथे भडकविण्याचे काम करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांच्या सर्व सुज्ञ नागरिकांना आणि युवा वर्गाने कोणत्याही खोट्या अफवेला बळी पडू नये. सोशल मीडियावर प्रसारित झालेला कोणतेही पोस्ट अथवा बातमीची शहानिशा करावी. सध्या माथे भडकविण्याचे काम समाकंटक करत आहे. -योगेश साठे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *