• Tue. Mar 10th, 2026

रविवारी सावेडी बस स्थानक येथे होणार ढब्बू लोकमकात्या सूर्यनामा

ByMirror

Nov 2, 2024

45 वर्षे जागा लोक उपयोगासाठी आणली नसल्याचे स्पष्टीकरण

नगर शहरासह जिल्ह्यातील लोकशाही म्हणजे वेड्या बाभळीची शेती ठरली असल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीला तिलांजली वाहिल्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यातील लोकशाही म्हणजे वेड्या बाभळीची शेती ठरली असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आला आहे. 45 वर्षे लोक उपयोगासाठी जागा आणली नसल्यामुळे सावेडी बस स्थानकाच्या जागेवर संघटनेच्या वतीने रविवार 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ढब्बू लोकमकात्या सूर्यनामा केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.


गेल्या अडीच दशकांमध्ये नगरच्या लोकप्रतिनिधींनी सत्ता, संपत्ती आणि फ्लेक्स वरील बडेजावला प्राधान्य दिले. त्यामुळे शहरातील सावेडी बस स्थानक येथील कोट्यावधी रुपयांची साडेआठ एकर जागा आज पर्यंत पडून आहे. अकरा एकर जमिन 1980 साली एसटी महामंडळाने संपादित करून ताब्यात घेतली. त्यापैकी अडीच एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला देण्यात आली, परंतु उरलेली साडेआठ एकर जमीन गेली 44 वर्षे लोक उपयोगासाठी वापरली गेली नाही. त्यावर कचराकुंडीचे राज्य असून, नगर हे महानगर मध्ये रूपांतरित झाले अशा वेळेस या साडेआठ एकरांच्या जमिनीवर जागतिक दर्जाचे अत्याधुनिक बस स्थानक करण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केला नाही. त्यामुळे नगरच्या मागच्या दोन पिढ्यांचे नुकसान झाले. याच कारणांसाठी डब्बू लोकमकात्या सूर्यनामा संघटनांच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.


एसटी महामंडळ हे नोकरशाही चालवीत असलेला पांढराहत्ती झालेला आहे. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी सरकार आणि सरकारी महामंडळावर लक्ष ठेवत नसेल, तर त्यातून जनतेच्या हिताचा बट्टयाबोळ होतो, याची प्रचिती सावेडीच्या बस स्थानकावरुन दिसून येते. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी फुगड्या, रांगोळी, मेहंदी अशा फुटकल गोष्टींच्या नादी न लागता शिवाजी महाराजांचा वारसा चालविणाऱ्या लोकभक्ती, ज्ञानभक्ती व कर्मभक्ती असलेल्या लोकप्रतिनिधींची निवड करावी आणि लोक डिच्चू कावा आणि लोक डिच्चू फत्ते या महामंत्राचा अवलंब करावा, यासाठी हा सूर्यनामा जारी करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या सगळ्या बसेस खटारा आणि धुळीने माखलेल्या आहेत. संपूर्ण एसटी महामंडळ टक्केवारीच्या खावडीने ग्रासले आहे. एसटी महामंडळ दिवाळखोरीमध्ये ढब्बू लोकमकात्यांनी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.


सत्तापेंढाऱ्यांनी कोट्यवधीरुपयांची माया निर्माण करून गुन्हेगाराच्या खाजगी फौजा स्थापन केल्या आहेत. ही बाब स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अवमान करणारी आहे. सावेडी बस स्थानकाच्या जागेवर कोट्यावधी रुपयाचे अत्याधुनिक महानगर सेंट्रल बस स्थानक करण्यासाठी यावेळी संघटनांच्या वतीने सूर्य साक्षी भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सावेडी बस स्थानक येथील ढब्बू लोकमकात्या सूर्यनाम्यासाठी ॲड. कारभारी गवळी, वीर बहादूर प्रजापती, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, जयेष देवळालीकर, डॉ. महेबूब शेख, केशव बरकते, रईस शेख, जसवंतसिंग परदेशी, बबलू खोसला, अशोक भोसले, राम धोत्रे, अशोक औशीकर, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, प्रशांत शिंदे, पोपटराव साठे, सुरेश पापडेजा, अल्ताफ शेख, एम.ए. इकबाल, सुनिल टाक आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *