• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

कापरी नदीतील अवैध वाळू तस्करी थांबण्यासाठी उपोषण

ByMirror

Oct 21, 2024
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा पाठपुरावा

पैसे घेऊन वाळूच्या गाड्या सोडणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा पाठपुरावा

नगर (प्रतिनिधी)- नांदगाव (ता. नगर) येथील के.के. रेंज लष्करी हद्दीतील कापरी नदीतून मोठ्या प्रमाणात सर्रास सुरु असलेला अवैध वाळू उपसावर कारवाई व्हावी व वाळू तस्करांकडून पैसे घेऊन वाळूच्या गाड्या सोडणाऱ्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि.21 ऑक्टोबर) उपोषण करण्यात आले. या उपोषणात जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे, नगर तालुकाध्यक्ष राजू पवार, जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, विजय लोंढे, संतोष बर्डे, भाऊ भवारी, शरद चिकणे, विजय केदार, संतोष वाघ, गिताबाई चिकणे, सीना चिकणे, अंबादास जाधव आदी सहभागी झाले होते.


के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची अनेकवेळा तक्रार व उपोषण करुनही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाच्या आदेशाची व नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. वाळू तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासून महसुल व पोलीस प्रशासन कारवाई करण्यास पुढे येत नाही. अवैध वाळू वाहतुकीपासून ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सहा वाळू काढण्याच्या बोट सुरु असून, वीस ते पंचवीस हायवा टिप्पर वाळू घेऊन भरधाव वेगाने चालत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


नुकतेच एमआयडीसीचे पोलीस कर्मचारी दुचाकीवर येऊन ढवळपुरी ते जांभूळबंद रोड, कोंडीबाची वाडी हद्दीत वाळूने भरलेले सहा हायवा टिप्पर पकडण्यात आले होते. मात्र काही तासांनी तडजोड करून त्या सोडून देण्यात आले. या संदर्भातील व्हिडिओ चित्रीकरण करुन तो जिल्हा पोलीस अधीक्षकांना देऊन देखील कारवाई करण्यात आलेली नाही. सदर व्हिडिओ शूटिंग मधील गाडीवर आलेल्या पोलीस कर्मचारी यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी अनेकवेळा तक्रार करुनही कारवाई केली जात नाही. वाळू तस्करांकडून महसुल व पोलीसांना मलिदा मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *