• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

पित्याच्या खूनप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा’; अन्यथा 3 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

ByMirror

Jul 29, 2026
आत्महत्या नव्हे, नियोजित खून’; मुलीचा गंभीर आरोप, पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी

आत्महत्या नव्हे, नियोजित खून’; मुलीचा गंभीर आरोप, पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी


अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याचा आरोप; संपत्तीच्या वादातून हत्येचा दावा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोपरगाव येथील लक्ष्मीनगर परिसरातील लोकनाट्य कलाकार एकनाथ धोंडीराम पगारे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा 3 ऑगस्ट 2026 पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा मयताच्या मुलगी ताई एकनाथ पगारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तपासातील दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.


निवेदनात ताई पगारे यांनी म्हटले आहे की, 3 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे वडील एकनाथ धोंडीराम पगारे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या तातडीने कोपरगाव येथील लक्ष्मीनगर, म्हसोबा चौक येथील घरी पोहोचल्या. त्यावेळी घटनास्थळी आई, भाऊ तसेच नातेवाईक उपस्थित होते. वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत विचारणा करताच संबंधित आरोपींनी त्यांना, त्यांच्या आईला आणि भावाला धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, त्यांनी वडिलांना तातडीने रुग्णालयात नेण्याची आणि पोलिसांना माहिती देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांचे कोणीही ऐकून घेतले नाही. उलट मोबाईल हिसकावून घेऊन शांत राहण्यास भाग पाडले आणि विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.


ताई पगारे यांनी निवेदनात गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केलेली नसून, आरोपींनी त्यांना मारहाण करून उशीने तोंड दाबून ठार मारले आणि त्यानंतर आत्महत्येचा बनाव करण्यासाठी दोरीच्या साहाय्याने पंख्याला लटकवले. हा प्रकार सुरू असताना त्यांचा भाऊ साईनाथ एकनाथ पगारे याने हा प्रकार पाहिल्याचा आणि त्यालाही धमकावून गप्प बसविल्याचा दावा करण्यात आला आहे.


घटनेनंतर संबंधित पोलीस ठाण्यात संपूर्ण माहिती देऊनही पोलिसांनी योग्य दखल घेतली नाही. संशयास्पद मृत्यू असूनही घटनास्थळाचा पंचनामा, आवश्‍यक तपास किंवा शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) यांसारखी कायदेशीर प्रक्रिया व्यवस्थित पार पडली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या संदर्भात 6 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे, त्यानंतर 28 डिसेंबर 2024 रोजी पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली. मात्र, त्यानंतरही कोणतीही प्रभावी कारवाई झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


तपासात प्रगती न झाल्याने अखेर 12 फेब्रुवारी 2025 रोजी कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागण्यात आली. आरसीसी क्रमांक 78/2025 अंतर्गत दाखल प्रकरणात न्यायालयाने बीएनएसएस कलम 175(3) (पूर्वी सीआरपीसी कलम 156(3)) अन्वये आदेश दिल्यानंतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनानुसार, आरोपींनी घरातील अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांची रोख रक्कम, 18 ते 20 तोळे सोन्याचे दागिने, 1 ते दीड किलो चांदीचे दागिने, शेतजमिनीची कागदपत्रे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रेही बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मयत एकनाथ पगारे हे महाराष्ट्रभर लोकनाट्य (तमाशा) क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार असल्याने त्यांनी आयुष्यभर कष्टाने कमावलेली संपत्तीही या प्रकरणात लुटली गेल्याचा दावा त्यांच्या मुलीने केला आहे.


या प्रकरणातील आरोपींनी कोपरगाव जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज क्रमांक 28/2026 दाखल केला होता. मात्र, 2 मार्च 2026 रोजी न्यायालयाने सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरीदेखील संबंधित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रकरणाला जवळपास दोन वर्षे उलटूनही आरोपींवर प्रभावी कारवाई झालेली नाही. उलट संबंधित आरोपींकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप ताई पगारे यांनी केला आहे. त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष तपास करण्यात यावा, अन्यथा 3 ऑगस्ट 2026 पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *