• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसह बसपाचे उपोषण

ByMirror

Oct 14, 2024
शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अंबादास लहानु सूर्यवंशी या कर्जत येथील माजी सैनिकाच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले. या उपोषणाला बहुजन समाज पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.


या उपोषणात बसपाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, दत्तात्रय सोनवणे, प्रमिला सोनवणे, सारिका सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, नयन सूर्यवंशी, सूर्यकांत सोनवणे, सुरेश वाघमोडे, सारिका वाघमोडे, अनिल पोटफाडे, अशोक वाघमोडे, सागर मदने, तुषार पंडित आदींसह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


अंबादास सूर्यवंशी माजी सैनिक असून, त्यांनी 1965 व 1971 च्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. 1966 मध्ये रवळगाव (ता. कर्जत) येथे शासनाकडून 10 एकर क्षेत्र मिळाले होते. त्यावेळी सैन्य दलात कार्यरत असल्याने त्यांच्याकडून जमिनीची मिळालेली ऑर्डर गहाळ झालेली आहे. त्यामुळे जमिनीचे खाते उतारे बनवण्याचे राहून गेले. ते जमीन त्यांच्या ताब्यात असून, विहित करीत होते. सात ते आठ वर्षापासून दादा किसन खेडकर या व्यक्तीला जमीन वाट्याने दिलेली होती. दोन वर्षापासून शेत पिकाचा वाटा देणे बंद केल्याने त्या व्यक्तीने शेती विहित करण्यास मनाई केली व त्या ठिकाणी तुरीचे पीक पेरलेले असताना तो व्यक्ती जबरदस्तीने त्या शेतावर हक्क बजावत आहे. 6 सप्टेंबर रोजी माजी सैनिकाची पत्नी शेतात गेली असता, त्या व्यक्तीने दमदाटी करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तर धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


शेती करण्यास व पीक घेत असताना सदरचा व्यक्ती विरोध करत आहे. सदर व्यक्तीवर मिरजगाव पोलीस स्टेशन येथे माजी सैनिकाचे कुटुंबीय गेले असता, पोलीस उपनिरीक्षक यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी तात्काळ संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी सैनिक कुटुंबीय व बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *