• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

द्रुतगतीमुळे नगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट

ByMirror

Jan 29, 2023

इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पाअंतर्गत कोपरगाव ते कान्हेगाव चाचणी यशस्वी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत कोपरगाव ते कान्हेगाव या 16 कि.मी. अंतराची पाचव्या टप्प्याची चाचणी शनिवारी (दि.28 जानेवारी) घेण्यात आली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पुर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पुर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करण्यात आला आहे.


गेल्या तीन वर्षापासून नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. आता कोपरगाव ते कान्हेगाव या 16 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण 60 कि.मी. अंतराची चाचणी घेतल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली.


मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईन मुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबून ठेवावी लागते. मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 125 प्रति कि.मी. वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसर्‍या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे. शनिवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागतील असा अंदाज आहे.

कोपरगाव ते कान्हेगाव द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेश अरोरा, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्र कुमार, इजिनिअर सुद्धांसू कुमार, ज्युनियर इंजिनियर प्रगती पटेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर व आदी उपस्थित होते.

मनमाड ते नगर डबल लाईन ( द्रुतगती ) रेल्वे मार्गाच्या पाचव्या टप्प्याची चाचणी शनिवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे. या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *