• Tue. Jul 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगावात महिला उद्योजकता विकास अभियानांतर्गत अहिल्या शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

ByMirror

Jul 20, 2026
केडगावात महिला उद्योजकता विकास अभियानांतर्गत अहिल्या शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

महिलांना मिळणार स्वाभिमानाचा रोजगार -मोनिका कुसळकर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने केडगाव येथे ‘अहिल्या महिला उद्योजकता विकास’ अधिकृत लघुउद्योग शिवणकाम केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले. याचवेळी आयोजित करण्यात आलेल्या महिला रोजगार मेळाव्यास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांना प्रशिक्षणासह कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग खुला होणार आहे. महिला उद्योजकता विकास अभियानांतर्गत सेवाभावी प्रबोधन समिती, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रोजगार निर्मिती अभियान आणि संजीवन उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना शिवणकामाचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी करून 100 टक्के रोजगाराची हमी देण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिवणकाम केंद्रात महिलांकडून विविध आकारांच्या गोधड्या, साध्या व फॅन्सी कुर्त्या, रेशीम कुर्ते, पायजमे तसेच इतर वस्त्रनिर्मिती केली जाणार आहे. उत्पादनासाठी आवश्‍यक कच्चा माल उपलब्ध करून देण्याबरोबरच तयार मालाची खरेदी संस्थेकडून करण्यात येणार असून, त्याचा मोबदला थेट महिलांना दिला जाणार आहे. त्यामुळे महिलांना बाजारपेठेची चिंता न करता रोजगाराची संधी मिळणार आहे.


या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक विजय पठारे, उद्योजक संदीप देशमुख, सेवाभावी प्रबोधन समितीचे अध्यक्ष तथा कल्याणी महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सौ. सुनीताताई मोडक, संजीवन उद्योग समूहाचे संदीप फुंदे, कार्यकारी अधिकारी प्रशांत लोणारी, केडगाव शिवणकाम केंद्राच्या अध्यक्षा मोनिका कुसळकर, रविंद्र कुसळकर यांच्यासह परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात उद्योजक संदीप फुंदे यांनी या अभियानाची व्यापक माहिती देताना सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात 4 हजार शिवणकाम केंद्रे स्थापन करून एक लाख महिलांना कायमस्वरूपी स्वाभिमानाचा रोजगार उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यभर शहरांसह ग्रामीण भागात जनजागृती व नोंदणी मोहिमा सुरू असून, महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण, आवश्‍यक कच्चा माल, उत्पादनासाठी मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांद्वारे अनुदानित कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांनी तयार केलेला माल संस्थेकडून खरेदी करून त्यांना नियमित आर्थिक परतावा दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत करताना मोनिका कुसळकर यांनी महिलांनी भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या प्रकल्पामुळे महिलांना सन्मानपूर्वक स्वतःचा रोजगार निर्माण करता येणार असून, कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीतही त्यांचा मोलाचा वाटा राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
संदीप फुंदे यांनी महिलांचे आर्थिक स्वावलंबन ही काळाची गरज असल्याचे सांगत, या उपक्रमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळणार असल्याचे नमूद केले. “कुटुंबाकडे हात पसरविण्याऐवजी कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारी सक्षम महिला घडविणे, हेच या प्रकल्पाचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.


प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सौ. सुनीताताई मोडक यांनी महिलांना आत्मविश्‍वास, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उद्योग-व्यवसायात यशस्वी होता येते, असे सांगितले. व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणींना न घाबरता सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत महाराष्ट्रभर उभारलेल्या उद्योग-व्यवसायाचा आणि सामाजिक कार्याचा स्वतःचा प्रवास त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. तसेच ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या सहवासातून प्रेरणा मिळाल्याचे सांगत सामाजिक बांधिलकीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. महिलांच्या विविध शंका आणि प्रश्‍नांचे समाधान करून त्यांनी या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली. ग्रामीण भागातील महिलांनी देखील या मेळाव्याला उपस्थिती लावून कौशल्याधारित प्रशिक्षण, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *