• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

युवा नेतृत्व प्रशिक्षण व समुदाय विकास शिबिरातंर्गत युवतींना योगाचे धडे

ByMirror

Jan 14, 2023

योग हे निरोगी जीवनासाठी मिळालेले वरदान -अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी शरीर व स्वास्थ्य मनासाठी योगा सर्वांसाठी आवश्यक आहे. दररोज योगा केल्याने शरीराला ऊर्जा आणि मनाला शांती मिळते. भारतीय संस्कृतीमध्ये निरोगी शरीरासाठी योगा महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर यांनी केले.


युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र व जय युवा अकॅडमीच्या वतीने भीमा गौतमी वसतीगृहात आयोजित तीन दिवसीय युवा नेतृत्व प्रशिक्षण व समुदाय विकास शिबिरातंर्गत युवतींसाठी योग शिबिर घेण्यात आले.

यावेळी अ‍ॅड. तोडकर बोलत होते. याप्रसंगी जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ.चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, रयतचे पोपट बनकर, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, प्रगती फाउंडेशनच्या अश्‍विनी वाघ, वसतीगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव, जय युवाचे दिनेश शिंदे, अमोल तांबडे, जयश्री शिंदे, शाहीर कान्हू सुंबे, जयेश शिंदे, कावेरी कैदके आदी उपस्थित होते.


पुढे अ‍ॅड. तोडकर म्हणाले की, धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यमातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेवू शकतो. योग हे निरोगी जीवनासाठी मिळालेले वरदान असल्याचे त्यांनी सांगितले. तर योगाची माहिती देऊन युवतींना त्यांनी प्रात्यक्षिकासह योगाचे धडे दिले.


अ‍ॅड. महेश शिंदे यांनी योगामुळे आपण मोठ्या आजारावर मात करू शकतो. आपल्याला दैनंदिन कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा योगाच्या माध्यमातून मिळते. योगामुळे मानसिक ताण-तणाव दूर करता येतो. त्यामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही सक्रीय आणि सक्षम करण्यासाठी योगासन हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रशिक्षणासाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, कार्यक्रम अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, रमेश घाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *