नगर तालुका तालीम सेवा संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव
‘तालीम संस्कृतीची परंपरा जपत नव्या मल्लांना घडविण्याचे काम कौतुकास्पद -उपसरपंच किरण जाधव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम सेवा संघाच्या अध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची फेरनिवड झाल्याबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गावात नुकतीच झालेल्या ग्रामसभेत पै. डोंगरे यांच्या फेरनिवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील कुस्ती क्षेत्राला सातत्याने मिळत असलेल्या प्रोत्साहनाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. यावेळी उपसरपंच किरण जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रविण पानसंबळ आणि केंद्रप्रमुख अतुल काकडे यांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अनिल डोंगरे, सागर कापसे, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, वसंत फलके, गणेश येणारे, राजू जाधव, पिंटू जाधव आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांच्या फेरनिवडीबद्दल साहेबराव बोडखे मित्र मंडळाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. भागचंद जाधव यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहेबराव बोडखे, भाऊसाहेब जाधव, भरत बोडखे, प्रमोद जाधव, प्रशांत जाधव, आनंद गावडे आदी उपस्थित होते.
नगर तालुका तालीम सेवा संघाच्या माध्यमातून तालुक्यातील कुस्ती क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे. संघाच्या वतीने विविध कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विविध स्पर्धांसाठी खेळाडूंच्या निवड चाचण्या घेऊन गुणवंत मल्लांची निवड केली जाते. निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संघाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य व प्रोत्साहन दिले जाते. ग्रामीण भागात अनेक होतकरू आणि गुणवान कुस्तीपटू आहेत. मात्र, आर्थिक अडचणी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, स्पर्धेचा पुरेसा अनुभव आणि योग्य व्यासपीठ न मिळाल्याने अनेक मल्लांच्या गुणवत्तेला अपेक्षित संधी मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन नगर तालुका तालीम सेवा संघाच्या माध्यमातून नवोदित मल्लांना संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याची भावना पै. नाना डोंगरे यांनी व्यक्त केली.
उपसरपंच किरण जाधव म्हणाले की, पै. नाना डोंगरे यांची नगर तालुका तालीम सेवा संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा फेरनिवड होणे ही निमगाव वाघासह संपूर्ण नगर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. डोंगरे यांनी केवळ कुस्ती क्षेत्रात काम केले नाही, तर ग्रामीण भागातील अनेक होतकरू मल्लांना प्रोत्साहन देऊन त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळवून दिली आहे. कुस्ती हा आपल्या मातीतला खेळ आहे. गावागावातील तालमींमध्ये सराव करणाऱ्या तरुणांमध्ये मोठी क्षमता आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून नगर तालुका तालीम सेवा संघाचे काम सुरू असून, सामाजिक भावनेने सुरु असलेल्या या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
साहेबराव बोडखे म्हणाले की, कुस्ती क्षेत्रासाठी सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. ग्रामीण भागात अनेक तरुण कुस्तीपटू अत्यंत मेहनतीने सराव करतात. त्यांच्यात गुणवत्ता असूनही योग्य संधी मिळत नाही. अशा मल्लांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांना मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचविण्याचे काम पै. नाना डोंगरे नगर तालुका तालीम सेवा संघाच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी कौतुक केले.

