ज्योतिष शास्त्रातील सेवाभावी कार्याची दखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात अहिल्यानगरचे ज्योतिषाचार्य विजयकुमार कुलकर्णी यांचा त्यांच्या ज्योतिषशास्त्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाच्या वतीने आयोजित या संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत कुलकर्णी यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. सीमा गाडेकर आणि ज्योतिषतज्ज्ञ पुष्पलता शेवाळे यांच्या हस्ते ज्योतिषाचार्य विजयकुमार कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार तसेच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित चंद्रकांत बोर्डे यांच्यासह ज्योतिष, अध्यात्म व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय ज्योतिष संमेलनामध्ये देशातील विविध भागांतून आलेल्या ज्योतिष अभ्यासक, विद्वान आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यावेळी ज्योतिषशास्त्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ज्योतिषशास्त्रातील बदलते प्रवाह, त्याचा अभ्यास, विविध पद्धती आणि समाजाला योग्य मार्गदर्शन देण्यामध्ये ज्योतिषाची भूमिका यासह विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले.
या संमेलनात ज्योतिषाचार्य विजयकुमार कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कुलकर्णी हे अनेक वर्षांपासून ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रात कार्यरत असून, या काळात त्यांनी अनेक नागरिकांना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केले आहे. ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास, अनुभव आणि मार्गदर्शनाची त्यांची पद्धत यामुळे त्यांना या क्षेत्रात विशेष ओळख निर्माण झाली आहे.
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केवळ भविष्यकथनापुरता मर्यादित न ठेवता त्याचा समाजाभिमुख पद्धतीने उपयोग करण्यावर कुलकर्णी यांनी भर दिला आहे. अनेक वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध व्यक्तींना त्यांच्या अडचणी व प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासू वृत्तीबरोबरच सेवा भावना आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

