स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान
विवेकी बुध्दीने महाराष्ट्रातील महिला मध्यप्रदेश व हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा दावा
नगर (प्रतिनिधी)- स्त्री-दास्य आणि मतदान दास्यातून मुक्ती मिळवणाऱ्या महिलांचा पीपल्स् हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने सावित्री संस्कार भुषण मानपत्राने गौरव करण्यात येणार आहे. शहरातील दिल्लीगेट वेस येथे शनिवार दि. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता संघटनांच्या पुढाकाराने पुरोगामी महिलांचा सन्मान येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.
स्त्री-दास्य आणि मतदान-दास्यातून मुक्ती मिळविण्याचा मार्ग प्रत्येक महिलेच्या निर्धार आणि कटाक्षाने अवलंब करण्यावर असतो. महाराष्ट्रातील महिलांना राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची शिकवणूक, संस्कार आणि आदर्श लहानपणापासून मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील महिला कोट्यवधीच्या संख्येने पुरोगामी ठरल्या आहेत. सन्मानाअगोदर महिलांना भारतीय संविधानावर हात ठेवून आपण स्वतः स्त्री-दास्य आणि मतदान-दास्यातून मुक्ती मिळविली असल्याचे घोषित करणार आहे.
या सन्मान सोहळ्याचे प्रारंभ भारतीय संविधान आणि राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन होणार आहे. पिढ्यानपिढ्या स्त्रीयांचे आर्थिक स्वातंत्र्याच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात शोषण झाले, परंतु सावित्रीबाई यांच्या कर्तृत्वामुळे भारतात सावित्री क्रांतीपर्व सुरू झाले आणि ते भारताच्या कानाकोपऱ्यात व्यापक होत आहे. आजचे राज्यकर्ते सत्ता, मालमत्ता आणि प्रतिष्ठा प्राप्तीसाठी थोरली बहिण, धाकटी बहिण, लाडकी बहिण यास्वरूपात देशातील महिलांवर मतदान-दास्य लादू पाहत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सावित्री संस्कारातून सारासार विवेकी झाल्यामुळे महाराष्ट्रात मध्यप्रदेश, हरियाणा राज्यातील स्त्री-मतदान दास्याची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होणार नाही असा विश्वास संघटनांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील सावित्री संस्कार भुषण सन्मान कॉ. बाबा आरगडे, कुलगुरू सर्जेराव निमसे, संध्या मेढे व ॲड.रंजना गवांदे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. सावित्री संस्कार सन्मान हा सुर्यसाक्षी आणि तमाम भारतसाक्षी सन्मान घोषित करण्यात आला आहे. भारतीय संविधानातील समता, बंधुता, आर्थिक, सामाजिक व राजकीय न्यायाची जाण या वेगळ्या उपक्रमामुळे व्यापक होण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, अर्शद शेख, ओम कदम, डॉ. मेहबुब शेख, शाहीर कान्हू सुंबे, वीर बहादूर प्रजापती, अशोक भोसले, सुधीर भद्रे, कैलास पठारे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.