शिक्षकांना सरकारी कामांसाठी वेठबिगारी प्रमाणे राबविणे दुर्देवी, आनंदराज आंबेडकर यांची खंत
चर्मकार समाजातील गुणवंतांचा व शिक्षकांचा सन्मान; आंबेडकर यांचा विशेष पुरस्काराने गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षकांना सरकारी कामांसाठी राबवून घेणे आणि हक्काची वेठबिगारी असल्याप्रमाणे त्यांच्याकडे पाहणे ही दुर्दैवी बाब आहे. शिक्षकांचा सन्मान राखला गेला पाहिजे. यासाठी संपूर्ण समाज शिक्षकांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. तसेच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आगामी काळात लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
चर्मकार विकास संघ, अहिल्यानगर, रविदासिया फाउंडेशन, मुंबई आणि लोकनेते मा. आमदार सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील चर्मकार समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आंबेडकर बोलत होते.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार काशिनाथ दाते, संदीपदादा घनदाट, ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर, युवा नेते अमन आंबेडकर, महिला बालकल्याणचे बालाजी सोनटक्के, तुकाराम शेंडे, सुभाष मराठे, नगरसेवक सुरेश बनसोडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, मधुकर घनदाट, रामराव ज्योतिक, मछिंद्र दळवी, आशा मराठे, प्रतिभा खामकर, आण्णासाहेब खैरे, गुणगौरव सोहळा समितीचे संतोष कानडे, सुरेश शेवाळे, अरुण गाडेकर, सुभाष सोनवणे, संजय कानडे, राजेंद्र धस, सुनील धस, रामदास सातपुतेभारत चिंधे, रामदास सोनवणे, रुक्मीणी नन्नवरे, हेमलता कांबळे, जयश्री पोटे,
मनिष कांबळे, भारत चिंधे, रामदास सोनवणे, दिलीप कांबळे, रुपेश लोखंडे रुक्मीणी नन्नवरे, हेमलता कांबळे, जयश्री पोटे, मनोज गंवादे, अण्णा खैरे, कारभारी देव्हारे, यांच्यासह समाजबांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले की, चर्मकार समाज आता रस्त्यावर उतरू लागला आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चर्मकार समाजही पुढे आला आहे. संजय खामकर यांनी सर्व मोर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबासाहेबांनी घटनेनुसार दिलेले आरक्षण कमी करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. अनुसूचित जातींच्या 59 जातींची एकजूट अबाधित राहण्यासाठी हा संघर्ष असल्याचे सांगत आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेबांनी 1961 मध्ये घटना दुरुस्तीचा संदर्भ देऊन निर्माण झालेली आरक्षणविरोधाची घाण साफ करण्यासाठी एकजुटीची हाक दिली.
कार्यक्रमाची सुरुवात भीमगीताने झाली. पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात संतोष कानडे यांनी मागील पंधरा वर्षांपासून समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला जात असल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना अनुसूचित जातींच्या 59 जातींची एकजूट बांधून ठेवण्यासाठी त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन कवी सुभाष सोनवणे यांनी केले. तसेच इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, पदवीधर, अभियंते, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, एमपीएससी-यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे युवक-युवती तसेच समाजातील आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संजय खामकर म्हणाले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्येचा गुणगौरव सोहळा आयोजित करून शिक्षण क्षेत्रात ऊर्जा देण्याचे काम दरवर्षी केले जात आहे. ज्येष्ठ साहित्यिक सोनाग्रा यांच्या स्मरणार्थ दीड लाख रुपयांची पुस्तके गुणवंतांना देण्यात आली आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून सामाजिक विचार पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षकांना नवीन पिढीकडून सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी जर्मनीमध्ये शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या उच्च दर्जाचा दाखला दिला. आपल्या देशातही शिक्षकांना असा सन्मान मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षकांचा सन्मान ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर म्हणाले की, शैक्षणिक धोरण बदलल्याने शिक्षकांना हात लावणे आणि रागाने पाहणेही अवघड झाले आहे. शिक्षक प्रामाणिक असल्यामुळे सरकार त्यांच्यावर विविध कामे लादत असल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विविध गमतीजमती सांगून सभागृहात हास्याची लकेर उमटवली.
आमदार काशिनाथ दाते म्हणाले की, शिक्षकेतर कामे सरकार विश्वासाने शिक्षकांना देते, ही वस्तुस्थिती आहे. सरकारचा गाडा चालविण्यासाठी सर्वांत महत्त्वाची मदत शिक्षकांकडून मिळते. शिक्षक चांगले काम करतात. त्यामुळे त्यांचा गुणगौरव होणे आवश्यक आहे आणि दरवर्षी या कार्यक्रमातून हे कार्य साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, माणूस संघर्ष करत राहिल्यास तो उत्तुंग शिखरावर पोहोचतो. संघर्ष आणि परिश्रमातून माणूस मोठा होतो. जो संघर्ष करत नाही, तो कुठेही चमकत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष येतो. आपण नोकरी करून शिक्षण घेतले आणि खासदारकीपर्यंत पोहोचलो, असा स्वतःचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. समाजातील पारंपरिक धंदे बुडाले असून उंची गाठण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे सांगत त्यांनी युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. जे शिक्षणाच्या माध्यमातून मोठे झाले आहेत, त्यांनी इतरांना शिक्षणासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तर संत रोहिदास भवन येथील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी 25 लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले, तर आभार सर्जेराव गायकवाड यांनी मानले.

