• Tue. Sep 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षक म्हणजे भावी पिढीच्या संस्कारांचा आधारवड! -ज्ञानदेव पांडुळे

ByMirror

Sep 7, 2026
शिक्षक म्हणजे भावी पिढीच्या संस्कारांचा आधारवड! -ज्ञानदेव पांडुळे

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत शिक्षक दिन उत्साहात; शिक्षकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शाळेतील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांच्या हस्ते शालेय शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महादेव भद्रे यांच्यासह मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, सोनाली अनभुल, रूपाली वाबळे, कांचन मदने, भारती सुसरे, भाग्यश्री लोंढे, कविता हिरणवळे, इंदुमती दरेकर, पूनम धाडगे, रूपाली पांडुळे, सौ. जगताप, बिडवे आदींसह शालेय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, शिक्षक हा भावी पिढीमध्ये संस्कार आणि सामाजिक मूल्ये जिवंत ठेवणारा प्रवाह आहे. शिक्षक मुलांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता, आत्मविश्‍वास, विवेक आणि चिकित्सकता निर्माण करून समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. चार भिंतींच्या आत केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापुरती शिक्षकांची भूमिका मर्यादित नसते. विद्यार्थ्यांना जगात भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांत ज्ञानरूपी बळ देण्याचे काम शिक्षक करीत असतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर म्हणाल्या की, शिक्षक भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवित आहे. शिक्षक हा समाजाचा आधारवड असून, विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करीत असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती आदर आणि निष्ठा कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे असते. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनीही आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *