अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न घरात ठेवू नका, आयोगासमोर मांडा!’
सर्व अल्पसंख्यांक समाज बांधवांनी समाजातील दुर्लक्षित प्रश्न मांडा -साहेबान जहागिरदार
मुस्लिमांसह ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी समाजाच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचा महत्त्वपूर्ण दौरा येत्या 9 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात होत असून, आयोगाचे अध्यक्ष प्यारे झिया खान, उपाध्यक्ष व सदस्य जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागिरदार यांनी जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्यांक समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रश्नांना आयोगासमोर थेट मांडण्याचे आवाहन केले आहे.
हा दौरा केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळवून देणारी महत्त्वपूर्ण संधी म्हणून त्याकडे पाहावे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचा हा दौरा केवळ मुस्लिम समाजापुरता मर्यादित नसून जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी तसेच इतर अधिसूचित अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी महत्त्वाचा असल्याचे जहागिरदार यांनी स्पष्ट केले.
समाजातील विविध घटकांना भेडसावणाऱ्या अडचणी, प्रलंबित मागण्या, विकासाशी संबंधित प्रश्न तसेच शासकीय पातळीवर येणाऱ्या अडथळ्यांची माहिती आयोगासमोर मांडण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाने आपल्या प्रश्नांची व्यवस्थित माहिती तयार करून ती संबंधित कागदपत्रांसह आयोगासमोर सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वक्फ, कब्रस्तान, धार्मिक स्थळे आणि मालमत्तांचे प्रश्न मांडण्याचे आवाहन अल्पसंख्यांक समाजातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. काही प्रश्न वक्फ बोर्डाशी संबंधित, तर काही धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी निगडित आहेत. त्याचबरोबर कब्रस्तान, धार्मिक स्थळे, दर्गे, ट्रस्ट व अल्पसंख्यांकांच्या मालमत्तांच्या संरक्षणाशी संबंधित प्रश्नही अनेक ठिकाणी निर्माण झाले आहेत. याशिवाय शिक्षण, रोजगार, सामाजिक विकास, शासकीय योजनांचा लाभ, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरील विविध अडचणी आणि इतर मूलभूत प्रश्नांबाबत नागरिकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागतो. अशा सर्व प्रश्नांची लेखी स्वरूपातील निवेदने व आवश्यक कागदपत्रे घेऊन आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन जहागिरदार यांनी केले आहे. सामाजिक संस्था, मस्जिद कमिट्या, ट्रस्ट व युवक-महिलांनी सहभागी व्हावे या दौऱ्यात जिल्ह्यातील सामाजिक संस्था, मस्जिद कमिट्या, दर्गा व ट्रस्टचे पदाधिकारी, वक्फ संस्थांचे प्रतिनिधी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच महिला प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
समाजातील प्रश्न केवळ बैठका, चर्चा किंवा सोशल मीडियापुरते मर्यादित न ठेवता ते अधिकृतरीत्या संबंधित यंत्रणेसमोर मांडणे गरजेचे आहे. लेखी स्वरूपात प्रश्न मांडल्यास त्यावर योग्य तो पाठपुरावा करण्याची मागणी आयोगाकडे करता येईल. सर्वांनी शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने आपल्या हक्काचे प्रश्न एकत्रितपणे मांडले, तर त्या आवाजाला निश्चितच अधिक बळ मिळेल. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नसून आपल्या समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची आहे, असे साहेबान जहागिरदार यांनी म्हटले आहे.
कोणत्याही एका पक्षाचा, संघटनेचा किंवा व्यक्तीचा प्रश्न म्हणून या दौऱ्याकडे न पाहता, संपूर्ण अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांसाठी मिळालेली संधी म्हणून त्याचा उपयोग करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रश्न मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रश्न घरात ठेवू नका, आयोगासमोर मांडा,” असा संदेश देण्यात आला आहे.

