• Tue. Sep 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

मी सावित्रीची लेक पुरस्कार 2026’ सोहळ्यात गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान

ByMirror

Sep 7, 2026
‘सावित्रीच्या लेकी’ ठरल्या यशाच्या मानकरी!

सावित्रीच्या लेकी’ ठरल्या यशाच्या मानकरी!

दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थिनींचा गुलाबी फेटा बांधून गौरव; स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरणाचा जागर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सावेडी येथे ‘मी सावित्रीची लेक पुरस्कार 2026’ हा प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.


स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहावे, या व्यापक उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रोफेसर चौकाजवळील हॉटेल रोज गोल्ड येथे दिवंगत विठ्ठल अंबी बुलबुले यांच्या प्रेरणेतून, अध्यक्ष नरेश कोटा, उपाध्यक्ष वैभव कंदी तसेच सर्व देणगीदार आणि सदस्यांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच अध्यक्षस्थान भूषविलेले प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालय व श्री मार्कंडेय विद्यालयाचे चेअरमन भीमराज नारायण कोडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थिनींना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शेण-दगडांचा मारा सहन करून स्त्री शिक्षणाचा जो पाया रचला, त्याच भक्कम पायावर आजच्या या सर्व यशस्विनी लेकी अभिमानाने उभ्या आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार केवळ तुमच्या यशाचा नाही, तर स्त्रीशक्तीचा सन्मान आहे.” मुलींच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाचे महत्त्व समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. “तुम्ही खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहात. भविष्यात कोणतीही अडचण आली तरी शिक्षणाची कास सोडू नका. उच्च ध्येय गाठा आणि आपल्या समाजाचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल करा,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.


यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पद्मशाली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश बाबुराव लकशेट्टी, सौ. रत्ना गणेश नजन, समाजसेविका सौ. अवंतिका चेतन सिरसुल, समाजसेवक विजयकुमार हनुमंत शेराल तसेच ‘स्त्री जन्माचे स्वागत’ उपक्रमाच्या मार्गदर्शिका कल्पनाताई विठ्ठल बुलबुले उपस्थित होत्या. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मुलींच्या उच्च शिक्षणाचे महत्त्व, महिला सबलीकरण, आत्मनिर्भरता आणि बदलत्या काळात मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज यावर विशेष भर दिला. मुलींना केवळ शिक्षण देणे पुरेसे नसून त्यांना आत्मविश्‍वास, निर्णयक्षमता आणि स्वावलंबनाची जाणीव करून देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अजय म्याना यांनी फोनवरून संपर्क साधून सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दहावी व बारावीमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, या सर्व विद्यार्थिनींच्या डोक्यावर मानाचा गुलाबी फेटा बांधण्यात आला होता. गुलाबी फेट्यात सजलेल्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतील अभिमानाने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.


या सोहळ्यास वंदनाताई दडगे, ज्योतीताई यमजाल, राहुल दुलम, निखिल कोटा, अवनी बुलबुले, प्रेरणा एक्कलदेवी, सिद्धेश कोंड्याल यांच्यासह गुणवंत विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता प्रकाश कोटा यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका नरेश भुमय्या कोटा यांनी मांडली. सुनंदा गंजी (नागुल) आणि संध्या पावसे यांनी उपस्थितांचे स्वागत करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्याताई सुरेश एक्कलदेवी यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *