• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्यमेव जयते व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ कोणता आणि त्याचा उपयोग काय? -अरुण खिची

ByMirror

Dec 12, 2023

प्रशासनाला जाहीर खुले पत्र

सत्यमेव जयते ब्रिदवाक्य व राजमुद्रेचा उपयोग करण्याचा अधिकार देण्याची केली मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीत सत्याला न्याय मागून देखील न्याय मिळत नसल्याने सत्यमेव जयते व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ कोणता व त्याचा उपयोग काय? हा प्रश्‍न उपस्थित करुन अरुणोदय क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण खिची यांनी जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जाहीर खुले पत्र पाठविले आहे. तर मागील 20 वर्षापासून सत्याच्या मार्गाने न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा करुन देखील त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसल्याने, मुख्यमंत्री यांना सत्यमेव जयते हे ब्रिदवाक्य व राजमुद्रा याचा खऱ्या अर्थाने उपयोग करण्याचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे.


कायदा व सत्याच्या मार्गाने न्याय मिळावा हा उद्देश बाळगून अनेकांना न्याय मिळत नाही. मिळेल अशी व्यवस्था व शाश्‍वती देखील राहिलेली नाही. सत्य मार्गाने न्याय मिळवा हीच प्रामाणिक इच्छा होती. मात्र तसे न होता, स्वत:च्या अनुभवातून सत्याला न्याय न मिळता बेकायदेशीर वागणारे नातेवाईकांना आर्थिक बळावर त्यांचे गुन्हे झाकण्याचे काम करण्यात आले. तक्रार देऊन देखील कायदेशीर कर्तव्याचे पालन संबंधित अधिकारी यांनी केले नाही. सत्य मार्गाची विडंबना होत असल्याचे वारंवार बहुतांश ठिकाणी दिसून आले. या प्रकरणातून कायद्यावरचा विश्‍वास उडत असल्याने कायदा हातात घ्यावा अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. याला आजची भ्रष्ट यंत्रणा हीच जबाबदार असल्याचा आरोप खिची यांनी केला आहे.


कायद्याने न्याय मिळत नसेल तर कायदे व नियमा पासून होणाऱ्या कार्यवाहीतून सूट द्यावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे. जर कायद्यालाच न्याय मिळत नसेल तर राज्य कोणाचे कायद्याचे की नीती भ्रष्ट असणाऱ्यांचे? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 4 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे लोकशाहीतील राजमुद्रा व सत्यमेव जयते या ब्रिदवाक्याचे व्यवस्थेकडून पालन होत नसल्याने तसा वापर करण्याचा अधिकार मिळण्याची मागणी खिची यांनी केली आहे.


यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून फक्त पुढील कार्यवाहीसाठी मुख्य राज्य शिष्टाचार विभाग, प्रधान सचिव व सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठविल्याची माहिती कळवली जाते. मात्र त्यावर अद्यापि कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. वारंवार हा पत्रव्यवहार सुरु असून, उत्तर देण्याचे मात्र टाळले जात आहे. नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे पुन्हा पत्र पाठवून या संदर्भात मागणी करण्यात आली असून, 25 डिसेंबर पर्यंत यासंदर्भात सत्यमेव जयते हे ब्रिदवाक्य व राजमुद्रा याचा वापर करावा किंवा नाही? याची परवानगी देणे अथवा प्रतिबंध करण्याचे कळविण्यात आले नाही, तर संबंधित विभागीय मंत्रालयाकडून तशी मुकसहमती प्राप्त झाल्याचे ग्राह्य धरून 26 डिसेंबर पासून अरुणोदय क्रांती सेवा संघाच्या वतीने सत्यमेव जयते हे ब्रिदवाक्य व राजमुद्रेचा वापर केला जाणार असल्याचे म्हंटले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *