• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वच्छता, मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी आक्रमक; मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

ByMirror

Aug 17, 2026
भिंगारच्या आरोग्य सुविधांचा बोजवारा

भिंगारच्या आरोग्य सुविधांचा बोजवारा

सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, डासांचा वाढता प्रादुर्भाव; तातडीने औषध फवारणी व स्वच्छता करण्याची मागणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातील आरोग्य सुविधांची झालेली दुरवस्था, सार्वजनिक शौचालयांची अस्वच्छता, मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव तसेच साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव याकडे भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्‍नांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्‍यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली.


आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार छावणी परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया पुरोहित यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, भिंगार युवक आघाडीचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, संपत (तात्या) बेरड, अनिल तेजी, सुदाम गांधले, दीपक लिपाने, प्रशांत डावरे, अजिंक्य भिंगारदिवे, रवी नामदे, सागर चवंडके, दिनेश लंगोटे, संकेत झोडगे, निखिल शिंदे, विजू नामदे, सचिन बिडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भिंगार शहरातील आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. नागरिकांना मूलभूत आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधांसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, अनेक शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत. काही ठिकाणी शौचालयांमध्ये विद्युत दिव्यांची सुविधाही उपलब्ध नाही. नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी निर्माण होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक शौचालयांची नियमित साफसफाई करून तेथे आवश्‍यक दुरुस्ती करण्यात यावी. तुटलेले दरवाजे बदलण्यात यावेत तसेच पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक सुविधा मिळणे आवश्‍यक असून, त्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


भिंगार शहरातील विविध भागांमध्ये मोकाट जनावरांचा व भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबरोबरच भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये डासांचे प्रमाण वाढत असतानाही प्रतिबंधात्मक औषध फवारणी होत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. अस्वच्छता, साचलेले पाणी आणि वाढलेले डास यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने औषध फवारणी सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.


शहरातील सार्वजनिक ठिकाणे, गटारे, शौचालय परिसर तसेच डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नियमित स्वच्छता व औषध फवारणी करावी. साथीचे आजार पसरण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक असून, प्रशासनाने याबाबत हलगर्जीपणा करू नये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. भिंगार शहरातील नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नियमित स्वच्छता, मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक औषध फवारणी या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *