शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी जाणून घेतले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठीचे उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेय कामकाजाचा आढावा घेतला. सुरू असलेले शैक्षणिक काम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.
शाळा तपासणीसाठी आलेले शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, केंद्रप्रमुख सुनिल नरसाळे यांचे स्वागत करुन शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका बाबासाहेब बोडखे यांनी मुलांचा सर्वांगीन विकास आणि गुणवत्ता वाढीसाठी शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. याप्रसंगी शालेय शिक्षिका अर्चना मकासरे, विदया सायंबर, प्रतिभा शेळके, तृषा मोढवे, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व उपस्थित अधिकाऱ्यांनी शालेय कामकाज व मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत केलेल्या लोकसहभागातून शाळेसाठी अत्यावश्यक असलेल्या भौतिक सुविधा व इतर कामाविषयी विशेष कौतुक करून मिशन आपुलकी अंतर्गत केलेल्या कामासाठी देणगी दिलेले सर्व देणगीदार व आदर्शवत काम करणाऱ्या राजमाता युवा मंचच्या (धनगरवाडी) सर्व युवकांचे आभार मानले.