• Thu. Jun 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

काम बंद करण्याच्या वादातून धमकी; सुपरवायझरची एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार

ByMirror

May 2, 2026
गुन्हे दाखल करुन स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

“हातपाय तोडून टाकू” अशी धमकी देत शिवीगाळ; दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कंपनीतील कंत्राटी काम बंद करण्याच्या वादातून एका सुपरवायझरला शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्वप्निल शंकर भरड (वय 31, रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते एका एक्साइड कंपनीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीमध्ये चिरंजीव दत्तात्रय गाढवे यांचे वेल्डिंगचे काम असल्याने त्यांचे वारंवार येणे-जाणे सुरू असते.


दि. 24 एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या गेट क्रमांक दोनवर चिरंजीव गाढवे व अरुण शिवाजी शिंदे यांनी भरड यांना अडवून कंपनीतील सुरू असलेले काम बंद करण्यास सांगितले. “हे काम मी दुसऱ्या ठेकेदारामार्फत करणार आहे,” असे गाढवे यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी भरड यांनी “मी व माझा मालक पाहून घेऊ,” असे उत्तर देत तेथून निघून गेले.


त्यानंतर दि. 28 एप्रिल रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा कंपनीच्या गेटसमोर त्यांची भेट झाली. यावेळी गाढवे व शिंदे यांनी भरड यांना “काम बंद का केले नाही? फार माजला का?” असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच “तू काम बंद केले नाही तर तुझे हातपाय तोडून टाकू,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यानंतर दोघे तेथून निघून गेले.


या घटनेनंतर स्वप्निल भरड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चिरंजीव दत्तात्रय गाढवे (रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) व अरुण शिवाजी शिंदे (रा. श्रीराम कॉलनी, पिंपरी चिंचवड) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *