• Sun. May 3rd, 2026

आकाशवाणी @ 90 उपक्रमात युवक-युवतींचा सहभाग

ByMirror

May 2, 2026

युवानमध्ये निबंध लेखन स्पर्धा उत्साहात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशभरामध्ये आकाशवाणीच्या स्थापनेला नव्वद वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने “आकाशवाणी @ 90” या विशेष उपक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि युवान या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध लेखन स्पर्धा अहिल्यानगर शहरात उत्साहात पार पडली.
पितळे बोर्डिंग अहिल्यानगर येथील युवान वसतिगृहात या स्पर्धेला प्रारंभ झाला. शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदविला. “आकाशवाणीचे बदलते स्वरूप, राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका; कृत्रिम बुद्धिमत्ता आणि युवकांसमोरची आव्हान; समाजमाध्यमं आणि युवक ” यांसारख्या विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार लेखन स्वरुपात मांडले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी आकाशवाणीचे कार्यक्रम आणि आकाशवाणी@90 या उपक्रमाविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. युवानचे संस्थापक संदीप कुसळकर यांनी आजच्या युगात आकाशवाणी सारख्या माध्यमातून राबविले जाणाऱ्या अशा उपक्रमामुळे युवकांना कशा पद्धतीने फायदा होतो? याविषयी मार्गदर्शन केलं. स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधांची निवड परीक्षकांकडून करण्यात आली. यात अक्षता दत्तात्रय वडवणीकर हिने प्रथम क्रमांक, आरती ज्ञानदेव आरगडे हिने द्वितीय, सुरज सुरेश चव्हाण याला तृतीय तर गौरी रविंद्र लहामगे आणि मंगेश दत्तात्रय गुंजाळ यांनी उत्तेजनार्थ बक्षीसे पटकावली.


विजेत्यांतर्फे मनोगत व्यक्त करतांना अक्षता वडवणीकर हिने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोबाईलच्या युगात तरुणांना अशा प्रकारे विचार करण्याची क्वचित संधी मिळत असल्याचे नमूद केले. मंगेश गुंजाळ यांनी स्पर्धा परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी अशा स्पर्धा आवश्‍यक असल्याचे सांगितले. विजेत्यांना आकाशवाणीवरील ‘युववाणी’ या कार्यक्रमात लवकरच विचार मांडण्याची संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.


सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आकाशवाणीशी अधिक जोडले जाण्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सातपुते, वृषाली घनवट, मीना जाधव, श्रेयस लहामगे, चेतन औटे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *