संत सावता महाराज मंदिर परिसर हिरवाईने नटणार
डोंगरे संस्था, नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला.
धार्मिक उत्सवाला सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची जोड देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. मंदिर परिसरात विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, विधीज्ञ ॲड. राजेश कावरे, साहेबराव बोडखे, लक्ष्मण चौरे, भाऊसाहेब आनंदकर, भागचंद जाधव, बापू पुंड, सिताराम फलके, भाऊसाहेब जाधव, बबन जाधव, प्रमोद जाधव, भरत बोडखे, संदीप डोंगरे, सदाशिव कापसे, सुशांत जाधव, नवनाथ हारदे, विजय जाधव, जयराम जाधव आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनाची जोड मिळणे गरजेचे आहे. वृक्ष हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. वाढते तापमान, बदलते हवामान आणि कमी होत चाललेली हिरवाई पाहता प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण करून धार्मिक स्थळाच्या परिसरातही हिरवाई वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आज लावलेले प्रत्येक झाड भविष्यात अनेकांना सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाचा आधार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. राजेश कावरे म्हणाले की, “पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण विकासाच्या दिशेने पुढे जात असताना निसर्गाचा समतोलही जपला पाहिजे. वृक्षांची संख्या वाढविण्याबरोबरच लावलेल्या झाडांचे संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाचा आणि जनसहभागाचा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश गावागावात पोहोचविता येऊ शकतो. धार्मिक स्थळांच्या परिसरात वृक्षारोपण केल्यामुळे भाविकांनाही निसर्ग संवर्धनाची प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

