कर्मवीरांच्या विचारांचा जागर; ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा डाव अन् ‘कर्मवीरांचा विजय असो’च्या घोषणांनी शहर दणाणले
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणाची दारे समाजातील सर्वसामान्य, वंचित व बहुजन समाजासाठी खुली करून ज्ञानाची ज्योत घरोघरी पोहोचविणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शहरात भव्य रॅली काढण्यात आली. मंगळवारी (दि. 22 सप्टेंबर) पार पडलेल्या या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे आकर्षक सादरीकरण आणि ‘कर्मवीरांचा विजय असो!’च्या घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘कमवा आणि शिका’ या संकल्पनेतून त्यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविले. त्यांच्या या कार्याची आणि विचारांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, तसेच कर्मवीरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने विद्यालयाच्या वतीने जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कापड बाजार येथून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रभागी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविला. शालेय मुलींनी सादर केलेल्या लेझीमच्या डावाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थिनींनी तालबद्ध पद्धतीने लेझीम सादर करत कर्मवीरांच्या जयंतीचा उत्साह द्विगुणित केला.
रॅलीमध्ये आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या रथात कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या प्रतिमेने रॅलीत सहभागी विद्यार्थी तसेच रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विविध घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याचा आणि सामाजिक विचारांचा जागर करत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले.
ही रॅली कापड बाजार येथून सुरू होऊन नवी पेठ रोड, गांधी मैदान, माणिक चौक मार्गे पुढे जात पुन्हा विद्यालयात पोहोचली. मार्गावरील नागरिकांनीही रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. कर्मवीरांच्या कार्याची माहिती देणाऱ्या घोषणांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरातील वातावरणात जयंतीचा उत्साह निर्माण झाला.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महादेव भद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शि स्त, एकजूट आणि उत्साहाचे दर्शन घडवत रॅली यशस्वी केली. रॅलीच्या आयोजनासाठी शालेय शिक्षिका मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंके, सुजाता दोमल, सोनाली अनभुल, रूपाली वाबळे, कांचन मदने, भारती सुसरे, भाग्यश्री लोंढे, कविता हिरणवळे, इंदुमती दरेकर, पुनम धाडगे, रूपाली पांडुळे, सौ. जगताप, बिडवे मावशी, कविता हिरणवाळे यांच्यासह माध्यमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षक मंगेश कारखिले, सुनीता लांडगे, उमेश विलायते, स्मिता पिसाळ, सुषमा गंभीरे, स्वाती गारुडकर, राजेंद्र देवकर, प्रदीप पालवे, ज्योती उबाळे, अमृता थोरात, सुप्रिया निमसे, सुवर्णा सानप, राजेंद्र गुंजकर, श्री भिंगारदिवे, श्रीमती शिंदे या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीने जपावा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवावे, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.

