• Tue. Sep 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

जायंट्‌स वेलफेअर फौंडेशन फेडरेशन 2A व 2B ची तिसरी कौन्सिल सभा उत्साहात

ByMirror

Sep 8, 2026
जायंट्‌स वेलफेअर फौंडेशन फेडरेशन 2A व 2B ची तिसरी कौन्सिल सभा उत्साहात

संजय गुगळे यांनी अहिल्यानगरमधील जायंट्सच्या सामाजिक चळवळीचा घेतला आढावा; 40 वर्षांपासूनचे सामाजिक कार्य


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्‌स वेलफेअर फौंडेशन फेडरेशन 2A व 2B ची संयुक्त तिसरी कौन्सिल सभा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. फेडरेशनच्या कार्याचा आढावा, विविध सामाजिक उपक्रमांना चालना देणे, ग्रुप व सदस्यवृद्धी तसेच आगामी उपक्रमांच्या नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी चितळे उद्योग समूहाचे मुख्य संचालक तथा जायंट्‌स सेंट्रल कमिटी सदस्य गिरीश चितळे यांनी मार्गदर्शन करताना जायंट्‌स ही केवळ एक संस्था नसून एक परिवार असल्याचे सांगितले. प्रत्येक ग्रुपने आपल्या कार्याचा विस्तार करण्याबरोबरच ग्रुप वृद्धी आणि सदस्य वृद्धीवर विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जायंट्‌सच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, त्याचा अधिकाधिक समाजघटकांना लाभ मिळण्यासाठी प्रत्येक सदस्याने सक्रिय सहभाग घेणे आवश्‍यक असल्याचे चितळे यांनी नमूद केले. आगामी बेंगळुरू कन्व्हेन्शनमध्ये जास्तीत जास्त संख्येने सदस्यांनी सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


यावेळी स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांनी अहिल्यानगर जायंट्‌स ग्रुपच्या कार्याचा आढावा मांडला. अहिल्यानगर ग्रुपने गेल्या 40 वर्षांपासून शहरामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले आहे, असे त्यांनी सांगितले. समाजसेवेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत जायंट्‌सने सामाजिक चळवळ म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, समाजसेवेत ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. भविष्यातही फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासोबतच सदस्यवृद्धीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गुगळे यांनी स्पष्ट केले.


या संयुक्त कौन्सिल सभेस जायंट्‌सचे विश्‍व उपाध्यक्ष विजयकुमारजी चौधरी (बाबूजी), डॉ. सतीश बापट, डॉ. अनिल माळी, विलास पवार, फेडरेशन अध्यक्ष जुगलकिशोर हरकूट, विनोद शेवटेकर, सौ. सूर्यमाला मलानी, फेडरेशनच्या उपाध्यक्षा संतोषी भालेराव, रत्नाकर महाजन, डायरेक्टर अनघा आंबेकर, सुमित गुप्ता, नरेश गुप्ता, दिलीप सावजी, बळवंत शिंदे, राजदत्त राजपूत आदी कौन्सिल सदस्य उपस्थित होते.


सभेच्या आयोजनाची जबाबदारी पायोनियर ग्रुपने घेतली होती. पायोनियर ग्रुपचे अध्यक्ष अजय अग्रवाल, सचिव अनुप अग्रवाल, अमित मलानी, विनोद अग्रवाल, सौ. शीतल अग्रवाल आणि सारिका मलानी यांनी सभेचे नियोजन व आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. सचिव सन्मती जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *