शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केली कामाची पहाणी
पाण्याचा निचरा होण्यासाठी 450 एमएमची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु -संतोष गेनाप्पा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्यात गटार तुंबून मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रभाग क्रमांक 13 मधील सबजेल चौक परिसरात बंद पाईपलाइन गटारीचे 450 एमएमची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले. या कामासाठी नगरसेविका सुवर्णाताई गेनाप्पा, नगरसेवक गणेश कवडे, संतोष गेनाप्पा व माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांच्या पाठपुराव्याने महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी उपलब्ध केलेल्या निधीच्या माध्यमातून सदर कामाला प्रारंभ करण्यात आले आहे.
सबजेल चौकात सुरु असलेल्या कामाची पहाणी शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, संतोष गेनाप्पा, संजय शेंडगे यांनी केली. सदर महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला दर्जेदार काम करण्याच्या सूचना केल्या.
संतोष गेनाप्पा म्हणाले की, उतार भाग असल्याने पाऊस झाल्यास शहरातील इतर भागातून पाण्याचा सर्व प्रवाह सबजेल चौकाकडे येतो. यामुळे येथील कमी व्यासाच्या गटारी तुंबून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर येऊन संपूर्ण परिसर जलमय होत होता. या भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी 450 एमएमची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजी कदम म्हणाले की, पावसाळ्यामुळे सबजेल चौक परिसरात पाणी साचत असल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत होती. या भागातून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिलांची नेहमीच वर्दळ असते. पावसाळ्यात पाणी साचल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता. हा प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक नगरसेवकांनी सोडवला आहे. नागरी प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडविण्यात येत आहे. त्यामुळे जनता देखील कायम शिवसेनेसोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गणेश कवडे म्हणाले की, स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. प्रभाग 13 मध्ये अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असून, जनतेची सेवा या भावनेने नगरसेवकांनी काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्थानिक नागरिकांनी पावसाचे पाणी साचून अनेकवेळा घरात देखील आले असून, हा प्रश्न कायमचा सोडविल्याबद्दल नगरसेवकांचे आभार मानले.