लाल मातीच्या आखाड्यात तोडीस तोड मल्ल भिडले; मल्लांनी पटकाविले लाखोंचे बक्षीस
शहरातील मल्लांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य राहणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सीना नदीकाठी असलेल्या श्री वारुळाचा मारुती मंदिर परिसरात नागपंचमीनिमित्त भरलेल्या जत्रेनिमित्त कुस्तीचे मैदान उत्साहात पार पडले. तब्बल 30 वर्षांनंतर यावर्षी प्रथमच शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने व हिंदुत्व प्रतिष्ठानच्या आयोजनातून झालेल्या या कुस्ती मैदानात नामवंत पहिलवानांच्या डावपेचांचा थरार रंगला होता. लाल मातीच्या आखाड्यात तोडीस तोड मल्ल उतरल्याने आखाडा रंगतदार झाला. रात्री उशीरा पर्यंत कुस्त्या सुरु होत्या.
शहरात सीना नदीकाठी असलेले श्री वारुळाचा मारुती हे अतिशय पुरातन मंदिर आणि जागृत देवस्थान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी नागपंचमीला येथे मोठी यात्रा भरत असते. शहराला व विशेष करुन नालेगावला कुस्तीची मोठी परंपरा असल्याने नवीन मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी या कुस्ती मैदानाचे आयोजन केले गेले. या मैदानात एक नंबरची कुस्ती ही साठ वर्षांनंतर ज्याने या महाराष्ट्राला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले व महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी असलेला पै. शिवराज राक्षे विरुद्ध पै.पवन कुमार (हरियाणा केसरी) यांच्यात आ. अरुणकाका जगताप, आ. संग्राम जगताप व पै. अनिल म्हस्के (वस्ताद) यांच्या हस्ते लावण्यात आली. पंच म्हणून पै. संभाजी लोंढे वस्ताद यांनी काम पाहिले. 10 मिनिटे झालेल्या लढतीत अनेक डाव प्रतिडावाची उधळण करत शेवटी शिवराज राक्षे यांनी एकचाक या डावावर विजय मिळवत 3 लाख रुपये रोख व चांदीची गदा पटकाविली.
दोन नंबरची कुस्ती ही महाराष्ट्र चॅम्पियन पै. युवराज चव्हाण विरुद्ध पैलवान जयदीप सिंग (पंजाब केसरी) यांच्यात 2 लाख रुपये इनामावर झाली. त्यात अवघ्या दोनच मिनिटात निकाल या डावावर युवराज चव्हाण यांनी प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवले. तीन नंबरची कुस्ती ही नालेगावचा महाराष्ट्र चॅम्पियन असलेला पै. ऋषी लांडे विरुद्ध श्रीगोंद्याचा पैलवान विजय पवार यांच्यात एक लाख रुपये इनामावर झाली. त्यात गुणांवर ऋषी लांडे यास विजय घोषित करण्यात आले. महाराष्ट्र चॅम्पियन पै. अक्षय पवार विरूद्ध पै.पप्पू काळे ही देखील अतिशय अटीतटीची लढत झाली. त्यात एकलंगी या डावावर पै.अक्षय पवार याने चितपटीने विजय मिळवला. त्यानंतर पैलवान आकाश घोडके महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध पैलवान अनुराग सिंह (इंदोर केसरी) यांच्यात 51 हजार रुपये इनामावर झालेल्या या लढतीत आकाश घोडके यांनी हप्ते या डावावर विजय मिळवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. नालेगावचा पैलवान चैतन्य शेळके याने प्रतिस्पर्ध्यावर घिस्सा या डावावर मात केली. बालमल्लाच्या लढतीत पैलवान जयदीप पठारे विरुद्ध पैलवान साहिल पगारे ही अतिशय प्रेक्षणीय कुस्ती झाली. पंधरा मिनिटे चाललेल्या या कुस्तीत एकेरी कस या डावावर जयदीप पठारे यांनी विजय मिळवला. तसेच पै.सौरभ शिंदे आणि पै.कौस्तुभ आंबेकर ही कुस्ती देखील अतिशय प्रेक्षणीय पार पडली. त्यात आकडी या डावावर सौरभ शिंदे यांनी विजय संपादन केले.
या कुस्ती मैदानासाठी पंच म्हणून पै. संभाजी लोंढे, उपमहाराष्ट्र केसरी पै. अनिल गुंजाळ, पै. अर्जुन (देवा) शेळके, पै. बंडू शेळके, पै.सारंग वाघ, पै. युवराज करंजुले, पै.अजय म्हस्के, पै.दादा पांडूळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. मैदानाचे सूत्रसंचालन पै. हांगेश्वर धायगुडे व पै.मिलिंद जपे यांनी केले. या मैदानासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून अनेक नामांकित मल्ल आणि वस्ताद मंडळींची हजेरी होती. कुस्ती पाहण्यासाठी परिसरातील मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. तर यात्रेसाठी आलेल्या महिला वर्गाने देखील कुस्ती पाहण्याचा आनंद घेतला. विजयी मल्लांची प्रेक्षकांनी वाहवा करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत रोख रक्कम देऊन बक्षिसांचा वर्षाव केला.
आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील मल्लांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हे मैदान यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल युवा नेते पै. महेश लोंढे यांनी उपस्थितांचे व सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानत यापुढील काळात देखील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पैलवान मारुती खंडागळे (वस्ताद) यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पै. वैभव वाघ, पै.संतोष लांडे, पै. काका शेळके,पै.मयुर जपे, पै.अशोक घोडके, पै. नाना डोंगरे, पै.सुनिल कदम, बाळासाहेब भापकर, पै. शिवाजी चव्हाण, अजय अजबे व हिंदुत्व प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.