वासन परिवाराचा सामाजिक सेवेचा 19 वर्षांचा अखंड सेवायज्ञ
नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया अन् रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!
211 रुग्णांची नेत्र तपासणी, 23 जणांवर होणार मोतिबिंदू शस्त्रक्रिया
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात उद्योग आणि व्यवसायांची वाढ होत असल्याने रोजगारनिर्मितीला चालना मिळत असून, अनेक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपणाऱ्या वासन परिवाराचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक जाणिवेतून गरजूंसाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरूममध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते.
वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजय वासन यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 19 वर्षांपासून दृष्टीदोष असलेल्या गरजू रुग्णांसाठी हा सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. केवळ व्यावसायिक प्रगती न साधता समाजातील गरजू घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा वासन परिवाराचा हा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
यावेळी वासन टोयोटाचे जनक आहुजा, अनिश आहुजा, आनंदऋषीजी नेत्रालयाचे आनंद छाजेड, डॉ. जालिंदर बोरुडे, हरजीतसिंग वधवा, मुन्ना जग्गी, कैलास नवलानी, सुनील थोरात, किशोर मुनोत, संतोष लांडे, विशाल पवार, डॉ. रवींद्र येरीकळे, जनकल्याण ब्लड बँकेचे डॉ. वसंतराव झेंडे, सोनाली कांदारे आदींसह वासन परिवारातील सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, सर्वात पहिले गो रक्षणाचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून केले. आजच्या काळातही गोसंरक्षणाची मोठी गरज आहे. अरुणोदय गोशाळेचे वारूळाचा मारुती मंदिर परिसरातील नवीन जागेत स्थलांतर झाले असून, प्रशस्त जागेत गोसंरक्षणाचे कार्य सुरू आहे. गोसंरक्षणाबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतल्यास अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल.
रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, रक्तदान ही केवळ वैयक्तिक मदत नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घेतल्यास रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा दूर होण्यास मदत होईल. रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जपत वासन परिवाराच्या वतीने अरुणोदय गोशाळेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. वासन टोयोटाचे जनक आहुजा यांच्या हस्ते हा धनादेश माजी नगरसेवक संभाजी पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिश आहुजा यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात जनक आहुजा यांनी वासन आणि आहुजा परिवाराच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे हे 19 वे वर्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 211 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 23 गरजू रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना नंबरचे चष्मे मोफत वितरित करण्यात आले. याचवेळी आयोजित रक्तदान शिबिरात वासन परिवारातील सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची जामगावकर यांनी केले.

