सूरमयी संगीत मैफलमध्ये रसिक श्रोते मंत्रमुग्ध
नव्या-जुन्या पिढीतील गाण्यांचे बहारदार सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- सप्तसूर फाउंडेशनच्या डॉक्टर कलाकारांनी सादर केलेली स्वर दीपावली पहाट अहिल्यानगरमध्ये रंगली होती. ही सूरमयी संगीत मैफिलीने दिवाळीचा गोडवा वाढवून कला रसिकांच्या मनात घर केले. यामध्ये पहाटेची गाणी, भूपाळ्या, भावगीत, भक्तीगीत, आजी कडून ऐकलेल्या ओव्या, समर गीत, नव्या-जुन्या पिढीतील गाण्यांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. या कलाविष्काराने उपस्थित रसिक भारावले.
डॉक्टर असलेल्या कलाकार मंडळींचा कार्यक्रम नेहमीच कलारसिकांना वेगळं ऐकवून जातो. हा त्यांचा वेगळेपणा पुन्हा रसिक श्रोत्यांच्या प्रशंसेस पात्र ठरला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात डॉक्टर मंडळींनी सादर केलेल्या गाण्यांना प्रतिसाद दिला. वल्लभाचार्य, कबीर, मीराबाई , शाहीर राम जोशी, सुरेश भट, शांता शेळके यांनी लिहिलेल्या गाण्यांपासून ते गायक सुधीर फडके, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, जयराम शिलेदार, प्रसाद सावकार, किशोरी अमोणकर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, मोहम्मद रफी, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, श्रेया घोषाल, अजय गोगावले, आर्या आंबेकर या सर्व दिग्गज लोकांची गाणी गायिले. तर काही शास्त्रीय संगीतातील चीजांपर्यंत डॉक्टर मंडळींनी अगदी लीलया गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम उत्तरोत्तर अधिक रंगत गेला. शेवटी रसिक श्रोत्यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या. सर्व उच्चशिक्षित व आपल्या कामात व्यस्त असलेले, फक्त गाण्याच्या प्रेमापोटी एकत्र येऊन कलारसिकांसाठी करत असलेल्या कार्यक्रमाबद्दल उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले.
स्वर दीपावली कार्यक्रमात नव्या जुन्या हिंदी-मराठी गाण्यांची जुगलबंदी रंगली होती. विं.दा. करंदीकर व रामदास फुटाणे यांच्या खुमासदार कविता सादर करून डॉ. अभिजीत पाठक यांनी उपस्थित श्रोत्यांना खिळवून ठेवले. लोकांना हसवून व कलासाधनेने आनंदी दीपावली कशी साजरी करावी याचे एक उत्तम उदाहरण या कार्यक्रमातून श्रोत्यांना मिळाले.
या कार्यक्रमात अहिल्यानगर मधील डॉक्टर असलेले कलाकार डॉ. विलास जोशी, डॉ. अभिजीत पाठक, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. रोहिणी काळे, डॉ. स्मिता केतकर, डॉ. योगिनी वाळिंबे, सौ. पल्लवी जोशी, डॉ. नीरज करंदीकर, डॉ. ज्योती दीपक, डॉ. सत्तार सय्यद, डॉ. शैलजा निसळ, डॉ. गीता करंदीकर, डॉ. प्रकाश टेकवाणी, डॉ. सरोज भिडे, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. प्राची पाटील, डॉ. सीमा गोरे, डॉ. दीपा मोहोळे, डॉ. अविनाश वारे, डॉ. सचिन पानपाटील, डॉ. रेशमा चेडे, डॉ. दीप्ती करंदीकर, डॉ. प्रीती नाईक यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी गायन व संगीत क्षेत्रातील तज्ञ मंडळी देखील उपस्थित होते.