• Wed. May 20th, 2026

कामरगाव इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीकडून गौरव

ByMirror

May 19, 2026

गावात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प


युवकांनी व्यसनापासून दूर राहून करिअर घडवावे -संदिप ढवळे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील कामरगाव येथील भारत सर्व सेवा संघ संचलित कामरगाव इंग्लिश स्कूलच्या दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कामरगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यालयाचा दहावीचा निकाल तब्बल 94.73 टक्के लागल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना ग्रामीण भागातून अधिकारी घडविण्यासाठी गावात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेची उभारणी करण्याचा मानसही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


हनुमान मंदिर सभागृह, कातोरेवाडी येथे आयोजित या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक कु. धनश्री बाळासाहेब ठोकळ हिने 92.60 टक्के गुण मिळवत पटकावला. द्वितीय क्रमांक हर्षदा अविनाश आंधळे हिने 86.80 टक्के गुणांसह मिळविला, तर समृद्धी अंकुश ठोकळ हिने 86.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. चतुर्थ क्रमांक किशोर विजय ठोकळ (84.80 टक्के) आणि पाचवा क्रमांक सुयश घनश्‍याम कातोरे (79.20 टक्के) यांनी प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष अभिनंदन करण्यात आले.


यावेळी ग्रामपंचायतचे विद्यमान प्रशासक तथा माजी सरपंच संदिप ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित युवकदेखील व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे. करिअर घडविण्याच्या महत्त्वाच्या वयात चुकीच्या मार्गावर गेल्यास संपूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे युवक-युवतींना योग्य दिशा देण्यासाठी गावात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार असून, त्यातून ग्रामीण भागातून अधिकारी घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


या कार्यक्रमास माजी सरपंच वसंतराव ठोकळ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम ठोकळ, माजी सरपंच तुकाराम कातोरे, लक्ष्मण शामराव ठोकळ, शिवाभाऊ सोनवणे, पत्रकार हेमंत साठे, गणेश बनकर, कैलास झरेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामविकास अधिकारी सचिन राठोड, ग्राम महसूल अधिकारी संतोष मांडगे, माजी आरोग्य अधिकारी बापूसाहेब शेळके, उद्योजक गणेश ठोकळ, प्रदीप साठे, वैभव ठोकळ, माजी सैनिक राजेंद्र शिंदे, रायचंद ठोकळ, संदिप गुंजाळ, अशोक कातोरे, योगेश ठोकळ, सुलतान शेख, संजय ठोकळ, आदम शेख, रावजी ठोकळ, दत्तू ठोकळ, नाना ठोकळ, शंकर ठोकळ, आनंदा ठोकळ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष साठे, फैयाज शेख, संदिप पाडेकर, गणेश खाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *