• Mon. Jul 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

सेवापुर्तीबद्दल सुभेदार हरेश औटी यांचा सन्मान

ByMirror

Nov 16, 2024
सेवापुर्तीबद्दल सुभेदार हरेश औटी यांचा सन्मान

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना व खासदार निलेश लंके यांच्या वतीने गावात झाला सत्कार

सेवानिवृत्त एसटी कर्मचारीच्या मुलांनी सैन्यदलात केलेली देशसेवा कौतुकास्पद -बलभीम कुबडे

नगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना व खासदार निलेश लंके यांच्या वतीने भारतीय सैन्यदलात 30 वर्ष देशसेवा करुन (एएससी) सुभेदार पदावरुन सेवानिवृत्त झालेले जामगावचे (ता. पारनेर) हरेश बबनराव औटी यांचा सेवापुर्तीबद्दल सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त एसटी कर्मचारी बबनराव औटी यांच्या दोन्ही मुलांनी लष्करात देश सेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा देखील सत्कार पार पडला.


संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे व इतर पदाधिकारी आणि खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांच्या हस्ते हरेश औटी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बलभीम कुबडे यांनी सेवानिवृत्त एसटी कर्मचारी बबनराव औटी यांनी आपल्या मुलांवर देशभक्तीचे धडे देऊन त्यांना सैन्य दलात पाठविले. त्यांनी उत्कृष्ट कार्य करुन निष्ठेने सेवा केल्याचे स्पष्ट करुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. दीपक लंके यांनी औटी यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


ग्रामस्थांच्या वतीने सेवापुर्तीबद्दल सुभेदार हरेश औटी यांची बॅण्ड पथकासह गावातून मिरवणुक काढण्यात आली. प्रारंभी मळगंगा मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी जामगावचे सरपंच बाळासाहेब माळी यांनी औटी यांचा सत्कार केला. याप्रसंगी गावातील विविध संस्थांमधील आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, कुटुंबीय व मित्रमंडळी उपस्थित होते. गावातील सर्व आजी-माजी सैनिकांनी सुद्धा औटी यांचा सन्मान केला.


सुभेदार हरेश औटी यांनी गावाने केलेले सहकार्य कधीच विसरणार नाही. आजी-माजी सैनिकांची एकजूट करून गावाच्या विकासासाठी व तरुणांसाठी चांगला उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. तर सामाजिक उपक्रमामध्ये गावकऱ्यांकडून सहकाऱ्याची अपेक्षा केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *