• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

कोल्हेवाडी फाट्यावर अवैध दारू व्यवसाय बंद करा

ByMirror

Mar 8, 2026
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यावर एन.पी.डी.ए. अंतर्गत कारवाईची मागणी


अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

कारवाई न झाल्यास 23 मार्चपासून विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जामखेड रोडवरील कोल्हेवाडी फाटा परिसरात सुरू असलेला अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या अवैध व्यवसायाबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास 23 मार्च पासून नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जामखेड रोडवरील कोल्हेवाडी फाटा येथे अवैध दारू व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू असून तो उघडपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्यवसाय अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन व भिंगार पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असल्याचा आरोपही समितीने केला आहे. या अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.


दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी एकनाथ वाघमारे (रा. कलात्खोपोली, जि. रायगड) हे उदरनिर्वाहासाठी कोल्हेवाडी येथे रोजंदारीच्या कामासाठी आले होते. दिवसभर काम केल्यानंतर त्यांना दारू पिण्याची सवय असल्याने ते कोल्हेवाडी फाटा येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या दारूच्या ठिकाणी गेले. तेथे दारू पिल्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


वाघमारे हे आदिवासी समाजातील असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडून प्रयत्न होऊ शकले नाहीत. मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती. तरीदेखील संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप समितीने केला आहे. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाची कृपादृष्टी असल्यामुळे सदर अवैध दारू व्यवसायावर कारवाई होत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


या पार्श्‍वभूमीवर, भविष्यात अशा प्रकारच्या अवैध व बनावट दारूमुळे कोणाचीही जीवितहानी होऊ नये, यासाठी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यावर एन.पी.डी.ए. (NPDA) अंतर्गत कठोर कारवाई करून त्याचा अवैध दारू व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *