राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने वेधले लक्ष
दोषींवर कठोर कारवाई व्हावी, नुकसान भरपाई मिळावी तर राज्यातील सर्वच गड, किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हिंसाचारातील कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी तर महाराष्ट्र राज्यातील सर्वच गड, किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण हाती घेण्याची मागणी करण्यात आली.
राज्य सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी गजापूर येथील हिंसाचार प्रकरणी उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले. ना. पवार यांनी या घटनेनंतर राज्य सरकारच्या वतीने तातडीने घटनास्थळी भेट देऊन तेथील लोकांना धीर देण्याचे काम केले आहे. हिंसाचारात नुकसान झालेल्या कुटुंबीयांना लवकरच मदत देखील करण्यात येणार असून, दोषींची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी फरीद सय्यद, मारुफ सय्यद, शाहनवाज शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विशाळगड (जि. कोल्हापूर) अतिक्रमणमुक्त करण्याच्या नावाखाली गडापासून 3 कि.मी. अंतरावर पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम समाजातील घरांवर नियोजित पध्दतीने समाजकंटकांनी हल्ले केले. घरात बसलेल्या महिला व ज्येष्ठांना मारहाण करण्यात आली. तर मशिदीची तोडफोड करुन धार्मिक ग्रंथाची विटंबना करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान करून वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यामध्ये कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.
मुस्लिम समाजातील काही व्यक्तींचे विशाळगडावर हॉटेल आहे. मात्र ते देखील उदरनिर्वाहासाठी तेथील माजी सरपंचांनी भाडे करारावर दिल्याचे समोर आले आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाचा प्रश्न समोपचाराने सुटण्याआधीच षडयंत्रपूर्वक मुस्लिम वस्तीला टार्गेट करुन हिंसाचार घडविण्यात आला. अतिक्रमणमुक्तीसाठी काढण्यात आलेल्या मोर्च्याची गरज होती का? हे देखील तपासण्याची गरज आहे. मशिदीवर केलेला हल्ला समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची दिलेली हाक, फक्त एकाच गडासाठी कशाला मर्यादीत असावी. राज्यातील शिवाजी महाराजांचे सर्वच गड, किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाने केली आहे.
ज्यांनी हे कृत्य केले ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असू शकत नाही. मुस्लिम सैन्यासाठी शिवाजी महाराजांनी रायगडावर मशिद बांधली, मात्र त्यांचे वंशज म्हणवणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कालीमा फासण्याचे काम करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनी निरापराध लोकांच्या घरावर हल्ले करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली असती.
अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जमावाने मुस्लिम समाजाला टार्गेट केले. तलवारी, काठ्या, कोयते अशी घातक शस्त्र घेऊन घरांची मोडतोड करुन वाहनांची जोडपोळ केली. धार्मिक स्थळाची विटंबना केली. पुरोगामी महाराष्ट्राला ही घटना अशोभनीय आहे.
या घटनेमुळे राज्यातील मुस्लिम समाज दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे. अशा घटनातून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचे काम केले जात आहे. विशाळगड येथील गजापूर हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हिंसाचारातील कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी तर महाराष्ट्र राज्यातील सर्वच गड, किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचे धोरण हाती घेण्याचे निवेदनात म्हंटले आहे.