निराधार, अनाथांच्या दिंडीतील सेवाकार्यातून घडतेय पांडूरंगाचे दर्शन -विजय भालसिंग
भजन, कीर्तन, फुगड्यांनी दुमदुमले भिंगार; दिंडीत अनाथ मुले व ज्येष्ठांचा सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी लासलगाव (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे निघालेल्या जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृद्धाश्रमाच्या पायी दिंडीचे भिंगार येथे भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. समाजातील वंचित, निराधार आणि अनाथांना मायेचा आधार देत त्यांच्यामध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करणाऱ्या आश्रमाच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग व देवदत्त शेंडे यांच्या पुढाकारातून झालेल्या या स्वागत सोहळ्यात वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी, सत्कार आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजराने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या दिंडीत आश्रमातील अनाथ विद्यार्थी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आश्रमाचे संस्थापक तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी महाराज यांचा विजय भालसिंग यांच्या हस्ते पूजन करून विठ्ठलाची सुंदर मूर्ती भेट देत सन्मान करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त डॉ. सुनिल सकट यांच्या हस्ते दिंडी प्रमुख, विणेकरी आणि चोपदार यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. दिंडी चालक तथा आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ, देवदत्त शेंडे, वारकरी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय भालसिंग म्हणाले की, पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती समाजसेवा, समता आणि माणुसकीचा संदेश देणारी चळवळ आहे. जय जनार्दन स्वामी आश्रमाने अनाथ बालके आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेतून उभे केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. या दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या सेवाभावातून साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम व वृद्धाश्रम कार्यरत आहे. या संस्थेमार्फत अनेक वर्षांपासून अनाथ बालकांचे संगोपन, त्यांचे शिक्षण, संस्कार, स्वावलंबन आणि विवाहापर्यंतची जबाबदारी स्वीकारली जात आहे. त्याचबरोबर निराधार वृद्धांना निवारा, अन्न, औषधोपचार आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. दरवर्षी आषाढी वारीनिमित्त आश्रमातील मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसह पायी दिंडी काढण्याची परंपरा जपली जात असल्याची माहिती आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांनी दिली.
तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी महाराज म्हणाले की, “जगात माणुसकी हाच सर्वांत मोठा धर्म आहे. आश्रमाची दारे प्रत्येक अनाथ, वंचित आणि निराधारासाठी कायम खुली आहेत. समाजातील दातृत्ववान व्यक्तींच्या सहकार्यामुळे अनेक मुलांना शिक्षण, संस्कार आणि आयुष्याची नवी दिशा देता आली. अनेक बालकांना सक्षम करून त्यांच्या विवाहापर्यंतची जबाबदारीही आश्रमाने पार पाडली आहे.”
यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्या कार्याचाही विशेष उल्लेख केला. मोठी आर्थिक क्षमता नसतानाही त्यांनी आश्रमाला वेळोवेळी मदतीचा हात दिला असून, त्यांनी भेट दिलेल्या संगणक संचाच्या माध्यमातून आजही आश्रमातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भिंगार येथील श्री बाणेश्वर मंदिरात दिंडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरात टाळ-मृदंगाच्या गजरात भजन, कीर्तन, गवळणी आणि हरिनाम संकीर्तनाने वातावरण भारावून गेले. दिंडीतील वारकऱ्यांनी रंगविलेल्या फुगड्यांनी आणि भक्तिरसाने उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गुरुवर्य तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी महाराज (बहुरूपी महाराज), सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांनीही फुगडीचा फेर धरत विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीचा आनंद लुटला.

