रिंगण सोहळ्यात दुमदुमला ‘जय हरी विठ्ठल’चा गजर; फुगड्या, नामस्मरण आणि भक्तीने भारावले वातावरण
वारकऱ्यांच्या साक्षीने वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीला भिंगारमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रवाना होताना भिंगारकरांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. दोन दिवस संपूर्ण भिंगार परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता. वारकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठलभक्तीचा उत्साह अनुभवत नागरिकांनी दिंडीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क समोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक रिंगण सोहळ्याने भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. ‘जय हरी विठ्ठल… श्री हरी विठ्ठल’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ आणि ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ, मृदंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात वारकरी भक्तिभावाने तल्लीन झाले होते. महिलांनी पारंपरिक फुगड्यांचा फेर धरत भक्तीचा आनंद व्यक्त केला, तर उपस्थित नागरिकांनीही विठ्ठल नामाचा जयघोष करत रिंगण सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी, रोहित चौकसी व त्यांच्या परिवाराच्या हस्ते दिंडीतील पालखीची आरती करण्यात आली. तसेच दिंडीचे प्रमुख ह.भ.प. उद्धव महाराज आनंदे यांचा वृक्ष, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, प्रांजली सपकाळ, हेमलता विजयवंशी, संगीता सपकाळ, सर्वेश सपकाळ, श्री विजयवंशी, जहीर सय्यद, अशोक पराते, ताराचंद ठोकळ, रवी लालबोंद्रे, भूषण लंगोटे, रवी नामदे, ईवान सपकाळ, सुनील लालबोंद्रे, दीपक गायकवाड, भाऊसाहेब खताडे, भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने वारकरी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी म्हणाल्या की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अमूल्य सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. भक्तीबरोबरच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश वारीतून दिला जातो. आज केलेले वृक्षारोपण हे भावी पिढ्यांसाठी हिरवाईची भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, भिंगारमध्ये दरवर्षी संत जनार्दन स्वामी महाराजांच्या पालखी दिंडीचे स्वागत आणि निरोप देण्याचे भाग्य लाभते, याचा आम्हाला अभिमान आहे. वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानून आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. वारीमधून समाजात बंधुभाव, सेवा, संस्कार आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. उद्धव महाराज आनंदे म्हणाले की, वारी म्हणजे चालता-बोलता संस्कार विद्यापीठ आहे. येथे जात, धर्म, पंथ, श्रीमंती-गरीबी असा कोणताही भेद नसतो; सर्वजण विठ्ठलाचे लेकरू म्हणून एकत्र चालतात. हरिनाम, सेवा, त्याग आणि प्रेम हीच वारीची खरी शिकवण आहे. आज पर्यावरण संवर्धनासाठी केलेले वृक्षारोपण हीदेखील विठ्ठल भक्तीच असल्याचे ते म्हणाले.
भक्तीबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत या सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क समोरील मैदानात वारकऱ्यांच्या उपस्थितीत ह.भ.प. उद्धव महाराज आनंदे व रोहित चौकसी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वारी ही केवळ भक्तीची नव्हे, तर समाजप्रबोधनाचीही परंपरा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
दोन दिवसांच्या मुक्कामात भिंगारकरांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. भिंगारमधील नागरिकांच्या प्रेम, आदरातिथ्य आणि सेवाभावामुळे वारकरीही भारावून गेले. निरोपाच्या वेळी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. विठ्ठल नामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दिंडीने पुढील प्रवासाला प्रस्थान केले.

