• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी पालकमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष व केमिस्ट असोसिएशनचा पुढाकार

ByMirror

Jul 12, 2026
वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती -आमदार संग्राम जगताप

हजारो वारकऱ्यांना मोफत औषधांचे वाटप; संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीत मोफत औषधोपचारचा उपक्रम


वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती -आमदार संग्राम जगताप


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था पुढे सरसावत असताना, पालकमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष व अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने आदर्शवत उपक्रम राबविला. शहरात मुक्कामी आलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाचा हजारो वारकऱ्यांनी लाभ घेतला.


या आरोग्यसेवा उपक्रमाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दत्ता गाडळकर, उपाध्यक्ष भरत सुपेकर, खजिनदार मनोज खेडकर, अमित महाराज धाडगे, सागर फुलसौंदर, अवधूत बोरुडे, संजय गुगळे, डॉ. विनय शहा, संभाजी काकडे, प्रेमकुमार तावरे, शिरीष बारस्कर, विनीत पोकळे, अजित तांबे, ज्ञानदेव यादव, श्रीराज सुपेकर, युवराज गुंजाळ, विकी दुल्लम, महेश म्हस्के यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पायदुखी, स्नायूंचा त्रास, थकवा तसेच इतर किरकोळ आजारांवरील आवश्‍यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. सलग पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे वारकऱ्यांसाठी फिजिअो थेरपी व मसाजची देखील सोय करण्यात आली होती.


सकाळच्या सत्रात कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी उपक्रमाला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना औषधांचे वाटप केले आणि अशा सेवाभावी उपक्रमांमुळे वारीची परंपरा अधिक समृद्ध होत असल्याचे सांगितले. दरवर्षीप्रमाणे यंदाही केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली. विशेषतः ज्येष्ठ वारकरी, महिला आणि लहान मुलांना आवश्‍यक औषधे व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पालकमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आरोग्य सेवा देण्यात आली. त्यामुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि समतेची महान परंपरा आहे. हजारो वारकरी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. या प्रवासात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येक समाजघटकाची जबाबदारी आहे. अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने अनेक वर्षांपासून सातत्याने राबविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तर पालकमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून यामध्ये आनखी भर पडली आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा असून, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची प्रेरणा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.


केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक दत्ता गाडळकर म्हणाले की, “आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला दरवर्षी लाभते. अनेक वारकरी सलग पायी प्रवास करत असल्याने त्यांना किरकोळ आरोग्य समस्या उद्भवतात. अशा वेळी त्वरित औषधे आणि प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू असून, प्रत्येक वर्षी हजारो वारकरी त्याचा लाभ घेत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा देणे हीच आमच्या असोसिएशनची परंपरा आहे. भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात अशा सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *