जात-वर्णभेद व पुरुषसत्ताक मानसिकतेविरोधात घटनात्मक लढा
सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मनुस्मृतीजन्य जात-वर्ण व्यवस्था, जन्माधारित श्रेष्ठत्व आणि पुरुषसत्ताक मानसिकतेविरोधात घटनात्मक मूल्यांच्या आधारे जनजागृती करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने ‘राष्ट्रीय धारणालय क्रांती आंदोलन’ घोषित करण्यात येणार आहे. बुधवार, दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ॲड. कारभारी गवळी आंदोलनाची माहिती देताना म्हणाले की, जातीय भेदभाव आणि पुरुषसत्ताक विचार केवळ कायद्याच्या माध्यमातून संपुष्टात येत नाहीत. सामाजिक रूढी, परंपरा आणि भेदभावपूर्ण मानसिकता बदलण्यासाठी व्यापक वैचारिक आणि सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता आहे. याच उद्देशाने ‘धारणालय क्रांती’ची संकल्पना मांडण्यात आली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, अहिंसा आणि मानवी प्रतिष्ठा या घटनात्मक मूल्यांचा प्रसार करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. जन्माच्या आधारावर कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानू नये, तसेच जात, लिंग किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर भेदभाव होऊ नये, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
आंदोलनाच्या प्रमुख कार्यदिशांमध्ये घटनात्मक मूल्यांचे शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता आणि श्रमप्रतिष्ठेला प्रोत्साहन देणे, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षण मिळण्यासाठी जनजागृती करणे तसेच महिलांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मालमत्ताविषयक अधिकार बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे यांचा समावेश आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्यावरही आंदोलनात भर दिला जाणार आहे. संविधानातील मूल्ये केवळ राज्यव्यवस्थेपुरती मर्यादित न राहता सामाजिक व्यवहारातही रुजली पाहिजेत, अशी भूमिका आयोजकांनी व्यक्त केली आहे.
ॲड. गवळी यांनी पुढे सांगितले की, हे आंदोलन कोणत्याही धर्म, जात किंवा व्यक्तीविरोधात नसून विषमता, भेदभाव आणि शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या विचारांविरोधात घटनात्मक व विवेकाधिष्ठित जनजागृतीचे आंदोलन असेल. नागरिकांनी सामाजिक विषमता ओळखून तिची चिकित्सा करावी आणि मानवी प्रतिष्ठेला पूरक मूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

