• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

ByMirror

Mar 8, 2026
संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर संयोजन समितीची नियोजन बैठक संपन्न

छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन


संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर संयोजन समितीची नियोजन बैठक संपन्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सहावे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीची नियोजन बैठक पार पडली.


रविवार, दि. 17 मे रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे, गणराज प्रकाशनचे प्रा. गणेश भगत, सुरेश खामकर, कवयित्री सरोज आल्हाट, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब कदम, राजेंद्र घोडके, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात आदी उपस्थित होते.


या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातील नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिक सहभागी होणार असून साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. यावेळी काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले असून अनेक कवी व कवयित्री आपल्या रचना सादर करणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे व कविता सादर करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाणार आहे.


या संमेलनात समाजातील विविध क्षेत्रांत निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी विशेष पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, उद्योजकता, कृषी, आरोग्य, धार्मिक आणि विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार’, ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान’ आणि ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


पै. नाना डोंगरे यांनी सांगितले की, समाजात अनेक व्यक्ती विविध क्षेत्रांत निस्वार्थपणे कार्य करीत असतात; मात्र त्या प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. अशा व्यक्तींचे समाजकार्य समाजापुढे आणून त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा, हा या पुरस्काराचा उद्देश आहे.


पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्तींनी दोन पासपोर्ट फोटोसह आपल्या कार्याचा संक्षिप्त परिचय आणि पुरस्कारासाठीचा प्रस्ताव 1 मे पर्यंत स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, अध्यक्ष पै. नाना डोंगरे, निमगाव वाघा, ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीसाठी 9226735346 व 8605775261 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *