• Fri. May 15th, 2026

निमगाव वाघा येथे शनिवारी रंगणार सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

ByMirror

May 14, 2026

स्वागताध्यक्षपदी माधवराव लामखडे, गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ॲड. कृष्णा झावरे


ग्रामीण साहित्य, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा होणार जागर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे शनिवार, दि. 16 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उद्योजक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रज्ञावंत व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा पंडितराव झावरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिवार मंगल कार्यालय, निमगाव वाघा येथे या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील साहित्य, संस्कृती, लोकपरंपरा आणि समाजप्रबोधनाचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात राज्यभरातील साहित्यिक, कवी, समाजप्रबोधक, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.


ग्रामीण साहित्याला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देणे तसेच समाजामध्ये वैचारिक जागृती निर्माण करणे हा या साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. संमेलनात विविध साहित्यिक परिसंवाद, विचारमंथन सत्रे, सामाजिक विषयांवरील चर्चासत्रे आणि काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक नामांकित कवी व कवयित्री आपल्या कविता सादर करणार असून ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या लोककला आणि साहित्य प्रकारांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे.


यावेळी छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडे, अभंग, प्रेरणादायी कविता आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे. समाजप्रबोधन, राष्ट्रभक्ती, स्त्रीशक्ती आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महामानवांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या संमेलनातून करण्यात येणार आहे.


माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे हे कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळींना सातत्याने पाठबळ देत असतात. ग्रामीण भागातील सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून यापूर्वीही त्यांनी विविध ग्रामीण काव्य व साहित्य संमेलनांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. साहित्य आणि समाजकार्याची विशेष आवड असलेल्या लामखडे यांच्या नियुक्तीमुळे संमेलनाच्या आयोजनाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.


तर अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा पंडितराव झावरे हे कायदे क्षेत्राबरोबरच सामाजिक चळवळींमध्येही सक्रिय योगदान देत आहेत. गरजू आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन प्रज्ञावंत आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *