विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जाणार; गावातून निघणार बाल वारकऱ्यांची ग्रंथ दिंडी
खासदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार उद्घाटन; सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माधवराव लामखडे यांची उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.25 जुलै) रोजी आषाढी एकादशी तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त ‘जगतगुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते होणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांच्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली.
या ग्रामीण साहित्य संमेलनात राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी गावातून विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांसह ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. या दिंडीत बाल वारकरी यांच्यासह साहित्यिक व कवी देखील सहभागी होणार आहेत. यानंतर परिवार मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने होणार आहेत. मध्य सत्रात कवी संमेलन रंगणार असून, त्याद्वारे ग्रामीण भागातील काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथ विक्रीचेही आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या समारोपीय सत्रात सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग व पर्यावरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जगद्गुरु संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार, वारकरी भूषण, राजश्री शाहू महाराज समाजभूषण, समजारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

