फिर्यादीच निघाला कटाचा मास्टरमाईंड; सत्य समोर आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार
तोफखाना पोलिसांच्या तपासाचे शिवसेनेकडून कौतुक; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अडकविण्याचा कट फसला
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील तुळजाभवानी मंदिराजवळील पुणेरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर घडलेल्या कथित गोळीबार आणि हल्ला प्रकरणाचा पर्दाफाश करून फिर्यादीच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड करणाऱ्या पोलीस दलाचा शिवसेनेच्या वतीने गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक जगदिश भांबळ, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्यासह तपास पथकातील अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्तात्रय कावरे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, शंकर शेळके, अशोक शेळके, सागर गलांडे, शिवराज गलांडे, प्रवीण गीते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील तुळजाभवानी मंदिराजवळील पुणेरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोरील गोळीबार आणि हल्ला प्रकरणाने काही दिवसांपूर्वी शहरात खळबळ उडवून दिली होती. मात्र, पोलीसांनी अत्यंत बारकाईने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाची उकल केली. तपासादरम्यान फिर्यादी चिरंजीव गाढवे यानेच स्वतःवर हल्ला घडवून आणण्यासाठी सुपारी देत बनावट गुन्ह्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. या कटामागे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न असल्याचेही तपासात समोर आले. मात्र, पोलीसांच्या निष्पक्ष आणि सखोल तपासामुळे सत्य बाहेर आले आणि हा कथित कट उधळून लावण्यात यश आले. याबद्दल शिवसेनेच्या वतीने पोलीस दलाचे आभार व्यक्त करण्यात आले.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नितिन उगलमुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार, सुधीर खाडे, सुरज वाबळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, शाकीर सय्यद, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, सुजय हिवाळे, सतिष शिंदे, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड आणि भागवत बांगर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले की, गोळीबार आणि हल्ल्याचा बनाव करून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणली. शहरात खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू असून, या घटनेच्या उलगड्यामुळे अशा प्रवृत्तींना काही प्रमाणात आळा बसणार आहे.
ते पुढे म्हणाले की, शहरातील काही ठरावीक हॉस्पिटल आणि डॉक्टरांकडून किरकोळ भांडणांमध्येही गंभीर जखमीचे प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे अनेक वेळा खोटे गुन्हे दाखल होण्यास मदत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारांचा शिवसेनेच्या माध्यमातून पर्दाफाश करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, शहरात अनेकदा एखाद्या व्यक्तीवर दबाव आणण्यासाठी किंवा त्याला अडकविण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात. कोणत्याही निरपराध व्यक्तीवर अन्याय होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सजगपणे काम करत आहे. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पोलीस दल प्रभावीपणे काम करत असून, तोफखाना पोलीसांनी या गुन्ह्याची उकल करून उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याचे सांगितले.
–—
काही हॉस्पिटलकडून देण्यात येत असलेल्या गंभीर दुखापतीच्या प्रमाणपत्रांचा गैरवापर
शहरात कुठेही मारहाणीची घटना घडली की गंभीर दुखापतीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी काही ठरावीक हॉस्पिटलमध्ये धाव घेतली जाते, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. संबंधित हॉस्पिटलमधील काही डॉक्टर राजकीय किंवा अन्य दबावाखाली किरकोळ मारहाणीच्या घटनांनाही गंभीर दुखापतीचे स्वरूप देणारी प्रमाणपत्रे देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे खोटे गुन्हे दाखल होण्यास वाव मिळत असल्याचे सांगत अशा प्रकारांचा पर्दाफाश करण्यात येणार असून संबंधित हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
